पुणे : शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या महिन्यात १६१ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. वर्षभरात आतापर्यंत डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या ६३३ वर गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या हद्दीत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. जुलैमध्ये संशयित रुग्णांची संख्या १६१ वर पोहोचली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. जुलै महिन्यात डेंग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात प्रथमच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. याच वेळी चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत वर्षभरात चिकुनगुन्याचे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा – पुणे : खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी जुलैमध्ये ५२० निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ४६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या १ हजार १३ नोटिशी बजावण्यात आल्या असून, एकूण एक लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा – राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, रत्नागिरी, रायगडला ‘रेड अलर्ट’

ससूनमध्ये रोज दोन ते तीन रुग्ण

ससूनमध्ये दररोज डेंग्यूचे दोन ते तीन संशयित रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची एनएस-१ आणि आयजीएम चाचणी केली जात आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने पाठविले जात आहे. या महिन्यात आतापर्यंत ९१ नमुने पाठविण्यात आले असून, त्यातील ७ ते ८ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Since the start of rain in pune the number of dengue patients has started increasing pune print news stj 05 ssb
Show comments