‘‘गार्गीला दत्तक घेतले आणि माझे आयुष्यच बदलले. शाळेत तिच्या नावापुढे माझे-म्हणजे तिच्या आईचे नाव येते, तेव्हा काही वेळा तिच्या मित्रमैत्रिणींना ते वेगळे वाटते. पण ती खूप समंजस आहे. कुटुंबात ‘बाबा’ नाहीत ही उणीव असली, तरी त्यामुळे सतत अपराधी वाटून घेण्याची गरज नाही हे आम्ही तिला समजावून सांगितले आहे. आता ती स्वत:च तिच्या पातळीवर असे प्रश्न सोडवते..’’
‘सिंगल मदर’ असलेल्या डॉ. श्रद्धा पिंगळे बोलत होत्या. श्रद्धा यांनी पुण्यातील ‘सोफोश’ (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून जनरल हॉस्पिटल) या संस्थेतून मुलगी दत्तक घेतली आहे. १४ ते २१ नोव्हेंबर हा आठवडा ‘दत्तकविधान जनजागृती आठवडा’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने ‘सोफोश’कडून याबाबत माहिती घेतली.
गेल्या दहा वर्षांपासून एकटय़ा स्त्रिया देखील मूल दत्तक घेण्यास पुढे होत असून पाच वर्षांपूर्वीपासून अशा दत्तकविधानांचे प्रमाण वाढू लागले आहे, अशी माहिती ‘सोफोश’च्या दत्तकविधान समन्वयक संगीता पवार यांनी दिली. सध्या संस्थेतून दर वर्षी तीन ते पाच ‘सिंगल मदर अडॉप्शन’ होतात. या वर्षी जानेवारीपासून ११ जणींनी ‘सिंगल मदर’ म्हणून संस्थेतून बाळ दत्तक घेण्यासाठी संपर्क साधला असून या सर्व जणी बाळ दत्तक घेण्यासाठीच्या विविध टप्प्यांवर आहेत. यातील ७ स्त्रिया परदेशी, तर ४ देशातील आहेत. विशेष म्हणजे देशातील ४ स्त्रियांपैकी तिघींची बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या तिघीही पुण्यातील आहेत.
‘विविध कारणांमुळे या स्त्रियांना एकटे राहावे लागले, तरी त्यांना स्वतंत्रपणे मूल वाढवण्याची इच्छा असते. बाळासाठी आई आणि बाबा या दोन्ही जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पार पाडू शकतात,’ असे पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘बाळ दत्तक देताना त्याला स्थिर, सुरक्षित आणि प्रेमळ घर मिळावे ही प्रमुख अपेक्षा असते. एकटी स्त्री जेव्हा बाळ दत्तक घेऊ इच्छिते, तेव्हा आयुष्यभर एका मुलाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ती वैयक्तिक पातळीवर तयार आहे का हे तपासले जाते. स्त्रीचे व्यक्तिमत्त्व, तिची निर्णयक्षमता, घरातील मंडळींचा पाठिंबा, बाळाच्या वाढीत सहभागी होण्याची त्यांची इच्छा या गोष्टीही पाहिल्या जातात. आई आणि वडील दोघे मिळून बाळाला जे देऊ शकतात तेच एकटी स्त्री देखील देऊ शकते असे आमचे निरीक्षण आहे. या सिंगल मदर्सच्या घरचे लोक आणि मित्रमंडळी देखील बाळाला वाढवण्याच्या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतात.’’
आतापर्यंत संस्थेतून एकूण ३५ ते ४० एकटय़ा स्त्रियांनी मूल दत्तक घेतले आहे. यातील १५ ते २० स्त्रिया देशातील आहेत. पिंगळे म्हणाल्या, ‘‘बाळ दत्तक घेण्यासाठी मी आधी पूर्णत: सकारात्मक नव्हते. पण घरात बाळ असावे अशी आई-बाबांची इच्छा होती. त्यांच्या पाठबळामुळे मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करू लागले. २००३ मध्ये दोन महिन्यांच्या गार्गीला दत्तक घेतले आणि आम्हा तिघांचे आयुष्यच बदलून गेले. आता ती १२ वर्षांची आहे. तिला वयाच्या तिसऱ्याचौथ्या वर्षांपासूनच आम्ही दत्तकविधान म्हणजे काय याची कल्पना देण्यास सुरुवात केली होती. मित्रमैत्रिणींचे पाहून लहानपणी मुले ‘आपल्याकडे बाबा नाहीत का,’ असा प्रश्न विचारतात. अशा वेळी खंबीर होऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगावी लागते. बाबा नाहीत ही खूप मोठी कमतरता नाही, हे मुलांना सांगून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देणे गरजेचे असते.’’