पुणे : प्रत्येक मंडळाच्या स्वतंत्र मिरवणुकीमुळे होणारी वाहनांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी, ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे होणारे ध्वनिप्रदूषण या गोष्टींना दूर ककत धनकवडीतील अकरा गणेश मंडळांनी शनिवारी (७ सप्टेंबर) गणेश चतुर्थीला संयुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकाच रथावर अकरा गणेश मूर्ती ठेवण्यात येणार असून या संयुक्त मिरवणुकीमुळे प्रत्येक मंडळाच्या मिरवणूक खर्चामध्ये किमान ५० हजार रुपयांची बचत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती शिपाई पदावर… काय आहे निर्णय?

धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजीनगर मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ या मंडळांनी संयुक्त मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी बारा वाजता गुलाबनगर येथून मिरवणूक सुरू होणार असून धनकवडी गाव, केशव काॅम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहननगर असा मिरवणुकीचा मार्ग असेल. यामध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ढोल-ताशा पथक, गोविंदा बँडपथकासह पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी परंपरेची झलक असलेल्या रथावर अकरा गणेश मूर्ती विराजमान असतील, या संयुक्त मिरवणुकीचे यंदा तिसरे वर्ष असल्याची माहिती आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनी सोमवारी दिली. प्रत्येक मंडळाला प्रतिष्ठापनेची स्वतंत्र मिरवणूक काढण्यासाठी किमान ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी हा खर्च १५ हजार रुपये आला होता. यंदाची महागाई ध्यानात घेता प्रत्येक मंडळाला हा खर्च १८ ते २० हजार रुपये येऊ शकेल, असे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयामुळे वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषण टाळणे शक्य होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Single procession of 11 ganapati mandals in dhankawdi to save money pune print news vvk 10 zws