रस्ता बंद करण्यात आल्यामुळे मध्यवर्ती भागापर्यंत वाहतूक कोंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दांडेकर पुलाशेजारून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर सिंहगड रस्त्याकडे जाणारी आणि या रस्त्यावरून येणारी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र पर्यायी रस्ताच नसल्यामुळे वाहनचालाकांना त्याचा मोठा फटका बसला आणि दुर्घटनेनंतर पर्यायी रस्त्याच्या मुद्यावरही पुन्हा चर्चा सुरू झाली. हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे मध्यवर्ती भागापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचेही स्पष्ट झाले.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. स्वारगेटपासून थेट खडकवासल्यापर्यंत जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता नेहमीच गजबजलेला आणि रस्त्यावर नित्यनेमाने कोंडी होते. धायरीपासून राजारामपुलापर्यंत तर सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण झालेली असते. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ते कागदावरच राहिले आहे. नदीपात्रातील वारजे-विठ्ठलवाडी रस्ता, राजाराम पूल ते फनटाईम पर्यंतचा उड्डाणपूल तसेच कालव्याच्या बाजूने रस्ता विकसित करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. त्यातील वारजे-विठ्ठलवाडी रस्ता न्यायालयाच्या आदेशामुळे उखडण्याची वेळ महापालिकेवर आली. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांचा फटका या रस्त्याला बसला. तर राजाराम पूल ते फनटाईम पर्यंतच्या उड्डाणपुलासाठी गेल्या दोन वर्षांपासून अंदाजपत्रकात फक्त तरतूद करण्यात आली.

मात्र अंदाजपत्रकातील हा आठ कोटी रुपयांचा निधी प्रभागातील अन्य कामांसाठी वळविण्यात आला आहे. डीपी रस्ताही या भागात नियोजित आहे. त्यापैकी कालव्या लगतचा रस्ता आणि डीपी रस्ता विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे दोन्ही मार्ग सिंहगड रस्त्यावरील, विठ्ठलवाडी, धायरी, आनंदनगर, हिंगणे, माणिकबाग या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविणार आहेत. राजारामपुलापासून कर्वेनगर, कोथरूड, नदीपात्र मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागात येत असले तरी या रस्त्यावरही वाहतुकीचा मोठा ताण आहे. त्यातच वारजे-कर्वेनगर नियोजित उड्डाणपुलाचे कामही रखडले आहे. तो होईल की नाही, याबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे.

शहरातील महत्त्वाचा रस्ता

दांडेकर पुलाशेजारील कालवा फुटल्यानंतर या पर्यायी रस्त्यांचा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला. दुर्घटनेनंतर सिंहगड रस्त्याकडून धायरीच्या बाजूने येणारी वाहतूक राजाराम पुलापासून पुढे थांबविण्यात आली. तर स्वारगेट, शास्त्री रस्त्याने दांडेकर पूल मार्गाने येणारी वाहतूक दांडेकर पुलाशेजारी तर स्वारगेटच्या बाजूला सारसबागेशेजारी थांबविण्यात आली. त्यामुळे उपरस्त्यातून वाट काढत वाहनाचालक मध्यवर्ती भागात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sinhagad route again underlined the need for an alternative road
Show comments