राज्यभरातील बहिष्कारी प्राध्यापकांना नेट-सेटमधून नियुक्तीच्या दिनांकापासून सूट मिळावी यासाठी आता विविध स्तरावरून शासनावर दबाव आणण्याचे तंत्र प्राध्यापक संघटनेने अवलंबले असून प्राध्यापकांच्या बहिष्काराला आता राजकीय रंगही चढू लागले आहेत. एमफुक्टोच्या सदस्यांनी बुधवारी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
राज्यभरातील प्राध्यापकांनी विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगानुसार ८० टक्के फरक देण्यात येणार असल्याचे राज्य आणि केंद्र शासनानेही यापूर्वीच जाहीर केले आहे. नेट-सेट उत्तीर्ण न केलेल्या प्राध्यापकांना एक एप्रिलपासून सूट देऊन नियमित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, तरीही नियुक्तीच्या दिनांकापासून नेट-सेटमधून सूट मिळावी यासाठी प्राध्यापक हटून बसले आहेत. या मागणीला राज्यशासनाकडून दाद दिली जात नाही असे लक्षात आल्यानंतर आता प्राध्यापक संघटनेने राज्यशासनावर विविध स्तरांमधून दबाव आणण्याचे तंत्र अवलंबले आहे. याचाच एक भाग म्हणून एमफुक्टोच्या सदस्यांनी येचुरी यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची बुधवारी भेट घेतली. गेल्याच आठवडय़ात पवार यांनी मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांची भेट घेतली होती. त्या वेळी सहाव्या वेतन आयोगातील ८० टक्के फरक प्राध्यापकांना देण्यात येणार असल्याचे राजू यांनी जाहीरही केले होते. मात्र, त्या वेळी नेट-सेटच्या प्रश्नावर तोडगा निघाला नव्हता.
पवार यांच्याकडे नेट-सेटच्या प्रश्नाबाबत प्राध्यापकांची बाजू मांडण्याची आवश्यकता वाटल्याने ही भेट घेण्यात आली होती, असे एमफुक्टोच्या सदस्यांनी सांगितले. या वेळी नेट-सेटच्या मागणीबरोबरच समाजकार्य महाविद्यालये, शारीरिक शिक्षण महाविद्यालये, कंत्राटी शिक्षक अशाही मुद्दय़ांवर पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर राज्यशासनाशी शुक्रवारी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे एमफुक्टोच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.
संघटनेत दुफळी?
एमफुक्टो ही संघटना मुळात कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली होती. कामगार संघटनांच्याच पाश्र्वभूमीवर एमफुक्टोचीही स्थापना झाली होती. मात्र, त्यानंतर इतर सर्व राजकीय पक्षांचा प्रभावही या संघटनेवर वाढू लागला. या सर्व पाश्र्वभूमीवर कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हालचाली सुरू केल्यामुळे संघटनेत राजकीय पातळीवर फूट पडल्याची चर्चा प्राध्यापकांमध्येच रंगली आहे. एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी मात्र ही शक्यता नाकारली आहे. याबाबत पाटील यांनी सांगितले, ‘‘पवार साहेबांकडे नेट-सेटच्या प्रश्नावर चर्चा करणे आवश्यक वाटले. सीताराम येचुरी यांचे संघटनेतील काही सदस्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांची भेट घेण्यात आली. मात्र, संघटनेत फूट पडलेली नाही.’’