राहुल खळदकर
ससून रुग्णालयातून अमली पदार्थाची (मेफेड्रोन) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणात सामील असलेल्या आणखी सहा आरोपींची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. मेफेड्रोन तयार करण्यासाठी रासायनिक पदार्थ, तसेच कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांची नावे पोलिसांना तपासात मिळाली आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित पाटीलसह सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.
हेही वाचा >>> बारावीचे गुण, सीईटीचे गुण एकत्रिकरणाबाबत लवकरच प्रस्ताव
समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख, गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील आणि साथीदार नाशिक येथील औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन तयार करत होते. संबंधित कारखाना समाधान कांबळे याच्या मालकीचा आहे. शिवाजी शिंदे हा मेफेड्राेन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवित होता, तसेच हरीश पंत, जिशान शेख आणि राहुल पंडित हे मेफेड्रॉन तयार करत होते. त्यांचे साथीदार इम्रान शेख आणि गोलू हे मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसाना तपासात मिळाली.
हेही वाचा >>> पुणे : गणवेश परिधान केला नाही, सहायक पोलीस आयुक्तांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
अटकेत असलेले आणि फरार असलेल्या आरोपींनी मेफेड्रोन विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमाविले. त्यांनी सोने, जमीन खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजण सामील आहेत का ?, तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करायचा. ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील ॲड. नीलम यादव-इथापे यांनी युक्तिवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, आरोपींचे वकील संदीप बाली यांनी सरकार पक्षाच्या युक्तिवादास विरोध केला. दोन आरोपी अटकेत आहेत. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांना पकडता आले नाही, हे पोलिसांचे अपयश आहे. या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी भूषण आणि साथीदार अभिषेक यांना पोलीस कोठडीत न देता. त्यांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, अशी विनंती ॲड. बाली यांनी युक्तिवादात केली.
ललित पाटीलकडून पाच किलो सोने खरेदी
ललित पाटीलचा भाऊ भूषण याच्या नाशिकमधील घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरात आठ पेन ड्राईव्ह सापडले आहेत. भूषणचा साथीदार अभिषेक याच्या घरातून तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रोन विक्रीतून ललितने पाच किलो सोने खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. नव्याने ज्या आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी दोन आरोपी जिशान शेख, शिवाजी शिंदे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने अटक करण्यात येणार अहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आतापर्यंत १२ साक्षीदारांकडे तपास केला आहे.