लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या खास शिबिरांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल साडेसहा हजार नागरिकांनी केवळ तीन दिवसांत आधार कार्ड अद्ययावत करून घेतले आहे. अद्यापही २५ लाख ९५ हजार नागरिकांचे आधार अद्ययावत करणे बाकी असून या नागरिकांसाठी १४ ते १६ एप्रिल या सुट्यांच्या दिवशी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आधार अद्ययावतीकरण करून घेण्याबाबत केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३० लाख २६ हजार ८२३ जणांचे आधार अद्ययावत करावे लागणार आहे. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ४२२६ जणांनीच आधार अद्ययावत केले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी आधारचा वापर केला जातो. त्यासाठी आता अद्ययावतीकरण केलेले आधार कार्डच स्वीकारले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधार अद्ययावत करणे गरजेचे आहे.
आणखी वाचा- पुणे: वाहन चालवण्याच्या परवान्याचा ‘स्मार्ट’ खोळंबा
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरासह जिल्ह्यात आधार अद्ययावतीकरणासाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ७ ते ९ एप्रिल या सुट्यांच्या दिवशी पहिले शिबिर पार पडले. जिल्ह्यातील २०२ आधार यंत्र तसेच महिला व बालविकास विभागाकील ७४ यंत्रे या शिबिरात अद्ययावतीकरणासाठी वापरण्यात आली. २०२ यंत्रे ही जिल्हा आणि शहरासाठी असतील, तर सध्या परीक्षांचा काळ असल्याने महिला व बाल विकास विभागाची यंत्रे सोयीनुसार वापरण्यात आली. या शिबिरात शहरासह जिल्ह्यातील साडेसहा हजार नागरिकांनी आपले आधार अद्ययावत करून घेतले, अशी माहिती आधारच्या जिल्हा समन्वयक उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांनी दिली.
आणखी वाचा- पुणे: ई-वाहनांची विक्री सुसाट; चालू वर्षात दुचाकी, तीन चाकींची ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
१४, १५ आणि १६ एप्रिल या तीन दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, भाषा अद्ययावत करता येणार आहे. त्याकरिता ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दहा वर्षांपूर्वी काढलेले आधार पुन्हा अद्ययावत करावे लागते. या शिबिरात केवळ आधार अद्ययावत करण्याची कामे करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. -रोहिणी आखाडे, आधार जिल्हा समन्वयक
नागरिकांनी ‘माय आधार’ उपयोजन (ॲप) डाउनलोड करून घरबल्या विनामूल्य आपला आधार तपशील अद्ययावत करावा. तसेच आधार संकेतस्थळाचा वापर करावा किंवा जवळच्या आधार केंद्रात जाऊन तपशील अद्ययावत करावा. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी