राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष विजय मिरगे खूनप्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मिरगे यांचा खून करून पसार झालेल्या सहाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. मुळशी तालुक्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मिरगे यांचा वाढलेला दबदबा आरोपींना सहन न झाल्याने त्यांनी मिरगे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अमर अशोक सणस, समीर अशोक सणस, मयूर अशोक सणस, अक्षय ऊर्फ दाद्या साहेबराव सुर्व, नीलेश शिवाजी मारणे, तुषार ऊर्फ अप्पा सुभाष गोगावले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २४ डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मिरगे मोटारीतून घरी निघाले होते. मुळशी तालुक्यातील भूगावनजीक हल्लेखोरांनी त्यांची मोटार अडवली. मिरगे यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुळशी तालुक्यात खळबळ उडाली होती. मिरगे यांचा खून राजकीय किंवा जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. मिरगे यांनी भूगाव येथील एका गृहप्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन दिली होती. मुळशीतील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मिरगे यांचा दबदबा वाढला होता. त्यामुळे आरोपी अमर सणस, त्याचे भाऊ समीर, मयूर हे मिरगे यांच्यावर चिडून होते. त्यांनी आरोपी अक्षय, नीलेश, तुषार यांच्याशी संगनमत करून मिरगे यांचा खून केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राम जाधव यांना मिळाली. कात्रज-देहू बाह्य़वळण मार्गावर शनिवारी (२ डिसेंबर) सापळा रचून सहा आरोपींना पकडले. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम जाधव, सहायक निरीक्षक होडगर आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. दरम्यान, मिरगे खूनप्रकरणातील आरोपींना न्यायालयाने ७ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.