भक्ती बिसुरे, पुणे

ब्रेन टय़ूमरने ग्रासलेल्या आपल्या बाळाला सर्वोत्तम उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पुण्यातील दाम्पत्याने मुंबईतील रुग्णालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र उपचारांदरम्यान बाळाने या जगाचा निरोप घेतला. दुखाचा डोंगर कोसळलेला असताना चिमुकल्याच्या आई-वडिलांनी धीर एकवटला आणि त्याच्या अवयवांचा उपयोग इतर बालकांना नवीन आयुष्य देण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायाने आयटी इंजिनियर असलेल्या बाळाच्या आई-वडिलांनी आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर आपल्या मुलाचे हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्निआ यांचे दान करण्याचे ठरवले. त्यामुळे चार वर्षीय बालकासह इतर पाच गरजू  बालक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्याला ब्रेन टय़ूमरचे निदान झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांकडून शहरातील डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्याच्या प्रयत्नात पालकांनी मुंबई येथील खासगी रुग्णालयात बाळाला दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि उपचारांदरम्यान हे बाळ मेंदूमृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर पालकांनी त्याचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली.

दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरजूंवर त्याच्या मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. हृदय ग्रीन कॉरिडॉर आणि एअर अँब्युलन्सच्या मदतीने चेन्नईतील रूग्णासाठी पाठवण्यात आले. तर कॉर्निआ मुंबईतील नेत्रपेढीकडे सोपवण्यात आले.

यकृताच्या विकाराने ग्रस्त असलेल्या चार वर्षांच्या बालकावर त्याच्या यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन वर्षांचे बालक सर्वात लहान अवयव दाता ठरले आहे. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मुंबई कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली.

Story img Loader