पुणे : आगामी विधानसभेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असं असले तरी महायुतीच्या स्थनिक नेत्यांमध्येच नव्हे तर एकाच पक्षामधील पदाधिकाऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे पहायला मिळत आहेत.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांच्यासह भाजपाच्या सहा नगरसेवकांचा यामध्ये समावेश असल्याने भाजपमध्ये सर्वकाही सुरळीत आहे, हे दिसून येत नाही. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा…Pmc Health Department : शहरबात – महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुखणे
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक मतदारसंघात काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाच्या नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे खडकवासला, शिवाजीनगर या मतदारसंघासह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंडे यांनी बुधवारी वडगाव शेरी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या मतदारसंघातील भाजपाचे सहा ते सात नगरसेवक हे अनुपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असणारे माजी आमदार बापू पठारे यांनी देखील बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले. माजी आमदार बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित झाल्याची चर्चा आहे. त्यातच पठारे यांच्यासह सहा ते सात नगरसेवक न आल्याने विधानसभा निवडणूकीसाठी त्यांनी वेगळा निर्णय घेतला का? याची चर्चा पदाधिका-यांच्या बैठकीमध्ये रंगली होती. यावर मुंडे यांनी काही अडचणीमुळे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी बैठकीला आले नसतील असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा
वडगावशेरी मतदारसंघ हा भाजपने घ्यावा. महायुतीत मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ दिल्यास भाजपच्या पदाधिकारी त्यांचे काम करणार नाही असा थेट इशारा या भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे या मागणीचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बैठकीतच आपल्या मनातील सल बोलून दाखवली.
लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात महायुतीचा शब्द न पाळल्याने भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कमी मताधिक्य मिळाले असा आरोपही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. वडगावशेरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. ज्या पक्षाचा आमदार मतदार संघात आहे, तो मतदार संघ संबंधित पक्षाला सोडला जाईल अशी प्राथमिक चर्चा महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात झालेली आहे. हा मतदारसंघ भाजप कडून गेल्यास आम्ही कोणीही अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार नाही असा थेट इशाराच पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्याने महायुतीच्या जागा वाटपामध्ये या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे