पुणे : कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे (एआय) धोरण हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, तांदूळ, कांदा आणि मका या सहा पिकांचा समावेश करण्यात आला असून, पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ही तरतूद पुरवणी अंदाजपत्रकात वाढविण्यात येणार आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.
‘कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर’ यासंदर्भात साखर संकुल येथे अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
पवार म्हणाले, ‘दोन-तीन वर्षांपासून ‘एआय’ आधारित शेतीचा प्रयोग सुरू असून, तो यशस्वी झाला आहे. ‘एआय’मुळे पन्नास टक्के पाण्याची आणि खताची बचत होणार असून, ऊस उत्पादन वाढणार आहे. पाण्याची कमतरता असेल तिथे फळबागा, त्यापुढे ऊस, कापूस, कांदा, मका, पाणी उपलब्ध तिथे भात अशा प्रकारची शेती विकसित करण्यात येत आहे. खासगी कंपन्यांचा या क्षेत्रात प्रवेश झाला आहे. सरकार तसेच या कंपन्या काय करणार याचे सादरीकरण करण्यात आले आहे,’ असे पवार यांनी सांगितले.
‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुणे विभागात ३५ हजार घरांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात जागांची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मुंद्राक शुल्क एक हजार रुपये आकारण्यात येणार असून, अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकल्पात सोलरद्वारे वीजनिर्मिती करण्यात येईल.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजपप्रवेशाबाबत ते म्हणाले, ‘ते एका राजकीय पक्षाचे आमदार होते. आता ते पराभूत झाले आहेत. त्यांनी कोणत्या पक्षात जावे, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.’मुंबईवरील हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा होता, असे विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले होते. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले,‘देश, राज्य आणि पोलीस व्यवस्था ताब्यात असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. कोणी दोषी आढळल्यास कारवाई करावी.’