पुणे : मुदतपूर्व जन्माला आलेल्या केवळ सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी झाला आहे. या बाळावर रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागात ७० दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर बऱ्या झालेल्या या बालकाला सुखरूपपणे घरी पाठविण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका महिलेला अकाली प्रसूतिकळा आल्याने तिला पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नवजात शिशू व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. उमेश वैद्य यांनी महिलेची प्रसूती केली. ही प्रसूती २६ व्या आठवड्यात झाल्याने बाळाचे वजन केवळ ६०० ग्रॅम होते. मुदतपूर्व जन्म झाल्याने बाळाला श्वसनास त्रास होत होता. याचबरोबर त्याला कावीळ संसर्ग झाल्याने प्रकृतीतील गुंतागुंत वाढली होती. या बाळाला नवजात बालक अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

आणखी वाचा-मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून

डॉ. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सिद्धार्थ मदभूषी, डॉ. अनुषा राव यांनी या बाळावर उपचार सुरू केले. अखेर ७० दिवसांनंतर बाळ बरे झाले. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. याबाबत डॉ. वैद्य म्हणाले, की बाळाचे फुफ्फुस विकसित झालेले नव्हते. तसेच इतर अवयवही पूर्णतः विकसित झालेले नव्हते. बाळाला एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. याचबरोबर अशक्तपणा, कमकुवत व ठिसूळ हाडे, स्तनपानाचा स्वीकार न करणे आदी समस्या त्याला होत्या. जन्मानंतर दोन आठवड्यांनी बाळावर कांगारू केअर पद्धतीने उपचार करण्यात आले. नंतर बाळाला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात केली. बाळाचे वजन दीड किलोवर पोहोचले. अखेर ७० दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी सोडण्यात आले.

आणखी वाचा-लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी

योग्य काळजी घेणे गरजेचे

मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाची चांगली काळजी घेणे हे त्याची वाढ आणि विकासाचे टप्पे गाठण्यात महत्त्वाचे ठरते. हे मेंदूच्या सामान्य वाढीस आवश्यक आहे. प्रगत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करता येते. बाळाच्या वाढीचा आणि वजनाचा मागोवा घेण्यासाठी नियमित तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असते, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मदभूषी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six hundred gram babys struggle to survive is finally successful pune print news stj 05 mrj