पिंपरी : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्तांवर हल्ला करणाऱ्या बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील मुख्य दरोडेखोरांच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातून अटक केली. या दरोडेखोरांकडून दागिने विकत घेणारा सराफ आणि त्यांना आश्रय देणाऱ्या नातेवाइकालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. परश्या गौतम काळे, भीमा आदेश काळे, धंग्या चंदर भोसले, राजेश अशोक काळे, अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले याला पोलिसांनी तीन मार्च रोजी अटक केली. आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, रोकड, तीन दुचाकी, हत्यारे असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरोडेखोरांकडे केलेल्या तपासात त्यांनी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दरोडे आणि चार घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार अभय विजय पंडित (वय ३८, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी अटक केली. अभय याला दागिने चोरीचे असल्याचे माहिती असतानादेखील त्याने दागिने खरेदी केले. तसेच, आरोपींनी दरोड्याचा गुन्हा केल्याचे माहिती असूनही सचिन याचा नातेवाईक गणेश शिवाजी काळे (रा. श्रीगोंदा, अहिल्यानगर) याने आरोपींना आश्रय दिला. त्यामुळे गणेशलादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील बहुळ गावातील फुलसुंदर वस्ती येथे २४ फेब्रुवारी रोजी पहाटे जयराम लक्ष्मण वाडेकर यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी जयराम यांचा मुलगा अशोक व त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्यावर वार करून एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजारांची रोकड लुटून नेली होती. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहायक निरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड हे जखमी झाले. दरम्यान, उपायुक्त पवार यांनी स्वसंरक्षणार्थ सचिन याच्या पायावर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला होता. सचिन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.