सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडेच जगली

मोठा गाजावाजा करून पुणे जिल्ह्य़ात राज्य शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांपैकी चाळीस टक्के झाडेच जगली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात लावण्यात आलेली साठ टक्के झाडे जगली नसल्याची कबुली दस्तुरखुद्द वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम केवळ छायाचित्रे काढण्यासाठी आणि चमकोगिरीपुरताच मर्यादित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

वृक्षांची वेगाने कमी होणारी संख्या आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम या गोष्टी लक्षात घेऊन पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने राज्यात वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या वतीने गेल्या वर्षी १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवड करण्यात आली होती. त्या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्य़ात १६.२७ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त म्हणजे २३.२६ लाख वृक्ष लागवड यशस्वीपणे केल्याचे वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यातील केवळ चाळीस टक्केच झाडे जगली आहेत.

सरकारच्या सामाजिक वनीकरण आणि वनविभागाबरोबरच इतर विभागांनाही वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात येते. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि विविध संस्था-संघटनांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येते. गेल्या वर्षी अनेक खासगी संस्था, संघटना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सुमारे सात लाक्ष झाडे जास्त लावल्याचा दिंडोरा पिटला गेला. परंतु, झाडे लावण्याचा कार्यक्रम केवळ देखावा ठरला आहे. झाडे लावल्यानंतर वर्षभर त्यांची निगा राखली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.‘गेल्या वर्षी एकूण लावलेल्या वृक्षांपैकी आठ लाख झाडे खासगी संस्था तर आठ लाख वनविभागाकडून लावण्यात आली होती. सामाजिक वनीकरण आणि वनविभागाने लावलेली सर्वच्या सर्व झाडे चांगल्या पद्धतीने जगली असून खासगी व स्वयंसेवी संस्थांनी लावलेल्या झाडांपैकी केवळ चाळीस टक्केच झाडे जगली आहेत’, अशी माहिती पुणे जिल्हा वृक्ष लागवड समितीचे सदस्य आणि उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी दिली.

जिल्ह्यत २२.१० लाख झाडे

राज्य शासनाने पुढील तीन वर्षांत पन्नास कोटी तर चालू वर्षांत चार कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला असून पुणे जिल्ह्य़ात २२.१० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. वनविभागाच्या पुणे क्षेत्रात ३९८, जुन्नरमध्ये २८४ आणि भोरमधील १७५.२५ हेक्टर परिसरात तसेच सामाजिक वनीकरण विभागांतर्गत अनुक्रमे ७.८० आणि १.१० लाख अशी एकूण ८.९ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे हे दोन विभाग सोडून इतर विभागांनी लावलेल्या झाडांची निगा वर्षभर राखली जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठीची ही एक चळवळ आहे. त्यामुळे त्यात सर्वाचा समावेश झाला पाहिजे, एवढेच काम जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींचे आहे. वर्षभर झाडांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन झाडांची काळजी घेतली पाहिजे.

– सौरभ राव, जिल्हाधिकारी

Story img Loader