पुणे : केंद्र सरकारचे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि राज्य सरकार यांच्यात करण्यात आलेल्या कराराअंतर्गत पुण्यात कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (३१ ऑगस्ट) दुपारी बारा वाजता या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असून, देशातील आणि परदेशातील विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांसाठीचे भाषा, कौशल्य शिक्षण उमेदवारांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> अरबी समुद्रात साठ वर्षांनी ऑगस्टमध्ये चक्रीवादळ
भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी या बाबतची माहिती दिली. युवा सेनेचे किरण साळी, यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, एनएसडीसीच्या व्यवस्थापक सोनाली गिल, एनएसडीसीचे उपमहाव्यवस्थापक सुमित सिंग या वेळी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन उभारण्यात आलेल्या केंद्रात भाषा, आरोग्यनिगा, सौंदर्य आणि आरोग्य, अभियांत्रिकी, आतिथ्य याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण सशुल्क आहे. या केंद्रातील प्रशिक्षण काही दिवसांत सुरू केले जाणार आहे.
हेही वाचा >>> पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
सोनाली गिल म्हणाल्या, की एनएसडीसीने परदेशात कुशल मनुष्यबळ पाठवण्यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनल ही स्वतंत्र संस्था निर्माण केली आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील ६० हजार उमेदवारांना रोजगार मिळाला आहे. कोणत्या देशांत कोणत्या क्षेत्रात मागणी आहे याचा अभ्यास करण्यात आला आहे. देशभरात आठ केंद्रे कार्यान्वित आहेत. जपान, इस्रायल अशा देशांमध्ये उमेदवारांना आरोग्यसेवा, वाहनचालक अशा नोकऱ्या मिळाल्या. एनएसडीसीच्या माध्यमातून भाषेपासून कायद्यांपर्यंत प्रशिक्षण उमेदवारांना दिले जाते. त्यानंतर विविध देशांच्या मागणीनुसार त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. परदेशातील नोकरीमुळे चांगले आर्थिक उत्पन्नही मिळते.
परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना घडतात. एनएसडीसी केंद्र सरकारची संस्था असल्याने उमेदवारांसाठी अत्यंत सुरक्षित असे व्यासपीठ आहे. एनएसडीसीने अनेक देशांशी करार केले आहेत. त्यामुळे विविध देशांत मनुष्यबळ पाठवले जाते. परदेशात पाठवलेल्या उमेदवारांशी नियमित संपर्क ठेवला जातो, असे सुमित सिंग यांनी सांगितले.