लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : जीवघेण्या हल्ल्यातील गुन्ह्यात आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगाराला पाठीशी घालणे काळेवाडी पोलीस ठाण्यातील फौजदाराला (पीएसआय) चांगलेच भोवले आहे. या फौजदाराचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले आहेत.
सचिन चव्हाण असे निलंबित केलेल्या फौजदाराचे नाव आहे. तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार रविवारी (२२ डिसेंबर) काळेवाडीतील पवनानगर येथे घडला. याप्रकरणी अनुप भोसले याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. तर, अक्षय भोसले, प्रणव गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेत सराईत गुन्हेगार प्रशांत भानुदास दिघे (वय ३२, रा. काळेवाडी) याचाही सहभाग असल्याचे फिर्यादीचे म्हणणे होते. मात्र, फौजदार सचिन चव्हाण यांनी प्रशांत दिघे याचे नाव गुन्ह्यात घेतले नाही. सत्ताधारी महायुतीतील शहरातील एका बड्यानेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
आणखी वाचा-खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
घटनास्थळावरील नागरिकांकडे पोलीसांनी चौकशी केली.परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. संभाषण ध्वनिमुद्रित (कॉल रेकॉर्डिंग) तपासण्यात आले. त्यामध्ये जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेत गुन्हेगार प्रशांत याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर तात्काळ प्रशांत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. प्रशांत हा पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यासारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत चव्हाण यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चौबे यांनी दिले.