बारामती: शालेय विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेच्या अध्यक्षा खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. 8) या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी या प्रसंगी स्लाईड़ शो द्वारे अवकाश व आकाश यांची तसेच विविध ग्रह व तारे त्यांचे खगोलशास्त्रीय महत्व व इतर माहिती विद्यार्थी व पालकांना दिली. या वेळी चार टेलिस्कोपच्या मदतीने विद्यार्थ्यांनी शुक्र, मंगळ, गुरु व चंद्राची पाहणी केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आकाश कसे पाहायचे याची सविस्तर माहिती प्रभुणे यांनी दिली.
कोणत्या कालावधीत ग्रह व तारे यांची स्थिती काय असते, कोणत्या वातावरणामध्ये कोणते ग्रह व तारे पाहता येतात, आकाशगंगा म्हणजे काय असते, ग्रह व ता-यांचे पृथ्वीपासूनचे अंतर या बाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या. भविष्यात फोरमच्या माध्यमातून खगोलशास्त्राची विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.