भारतीय हवाई दलाच्या ‘स्कायरायडर्स’ची तब्बल दहा हजार किलोमीटरचे अंतर 1pradakshina1पार करण्यासाठी ‘प्रदक्षिणा’ सुरू असून हे अंतर पार करण्यामध्ये यश संपादन केल्यास तो जागतिक विक्रम ठरणार आहे. त्यापैकी निम्मे अंतर म्हणजे पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठत ही प्रदक्षिणा मंगळवारी पुण्यामध्ये पोहोचली.
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना अभिवादन करण्याच्या उद्देशातून प्रदक्षिणा ही स्कायरायडर्सची मोहीम आखण्यात आली आहे. हवाई दलातील उड्डाणाचा अनुभव असलेल्या स्कायरायडर्समध्ये १३ जणांचा समावेश असून त्यापैकी सात जण वैमानिक आहेत. तर, सहा जणांचा ‘ग्राउंड स्टाफ’ हा त्यांना मदतनीस म्हणून चोखपणाने कामगिरी बजावत आहे. विंग कमांडर एम. पी. एस. सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम ३ फेब्रुवारीपासून पश्चिम बंगालमधील कलाईकोंडा येथून सुरू झाली. दररोज २०० ते २५० किलोमीटरचे अंतर पार करण्यात येत असून ही प्रदक्षिणा मंगळवारी सातारा येथून सकाळी उड्डाण करून पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) विसावली. प्रबोधिनीचे उपप्रमुख एअर व्हाइस मार्शल एस. पी. वागळे यांनी या चमूचे स्वागत केले. बुधवारी (२ मार्च) ही प्रदक्षिणा औरंगाबाद येथे जाणार आहे.
पॅराग्लायिडगमधील सध्याचा विक्रम हा ९ हजार १३३ किलोमीटरचा आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला असून २००९ मध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. हा विक्रम झेकोस्लोव्हाकियाच्या नावावर हा  आहे. १ मार्चपर्यंत २५ दिवसांत आमच्या संघाने पाच हजार किलोमीटरचा टप्पा पार केला असून २० मार्चपर्यंत उर्वरित टप्पा पार करून अवघ्या ४५ दिवसांत या विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आहे, असेही विंग कमांडर सोळंकी यांनी सांगितले.
बदलत्या हवामानासमोर कसोटी
पॅराग्लायडरप्रमाणे वैमानिक आपल्या पाठीवर पॅरामोटार वाहतो. हे उडणारे यंत्र असून १५० ते २०० सीसी क्षमतेचे इंजिन त्याला लावण्यात आले आहे. अगदी छोटय़ा जागेतही उतरू शकते अशा पॅरामोटारचा वेग ताशी ५० किलोमीटर उड्डाणाचा आहे. प्रदक्षिणा मोहिमेसाठी ट्राइक आणि फूटलाँच अशा दोन प्रकारच्या पॅरामोटार वापरण्यात आल्या असून त्याला १५ लिटर क्षमतेची इंधनटाकी आहे. खुले कॉकपिट असून वैमानिकाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसते. वाऱ्याच्या दिशेने पॅरामोटार मार्गक्रमण करते. त्यामुळे वारा अनुकूल असेल, तर वैमानिकाला फारसे प्रयास न करता उड्डाणाचा आनंद लुटता येतो. या सफरीमध्ये आम्हाला अनेक ठिकाणी दाट धुके, पाऊस, गारपीट आणि वादळी वारे अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. त्यावर मात करण्याचे कौशल्य संपादन केल्यामुळे या खडतर प्रवासाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले, असेही विंग कमांडर सोळंकी यांनी सांगितले.

Story img Loader