राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित ऊर्फ अप्पा काटे यांनी पालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता उल्हास भालेराव यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दापोडीत घडली. या प्रकरणी काटे यांच्याविरुध्द भोसरी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दुपारी काटे यांनी भालेराव यांना कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी बोलाचाली सुरू असताना अचानक काटे यांनी श्रीमुखात मारल्याचे भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचे पालिका वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. तक्रार करण्यासाठी भालेराव यांच्यासह पालिकेचे अधिकारी पोलीस ठाण्यात जमा झाले होते. मात्र, तक्रार मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भालेराव यांच्यावर दबाव होता. त्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल होत नव्हता. या संदर्भात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश केकाणे म्हणाले, काटे यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दापोडीतील अतिक्रमण पाडण्याच्या कारवाईसाठी स्थापत्य विभागाचे पथक आले होते. स्मशानभूमी शेजारील बांधकाम पाडण्यासाठी ते पथक गेले. तेव्हा काटे यांनी अटकाव केल्याने ते पथक हात हलवत परत गेले. दापोडीत कारवाई करता न आल्याने पथकाने बोपखेल गाठले व गणेशनगर येथील बांधकाम पाडले. काटे हे प्रथमच निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुध्द भंगारवाल्याकडून खंडणी मागितल्याची तक्रार झाली होती. याशिवाय, ध्वनिक्षेपकाची मर्यादा ओलांडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader