पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या बाजूने घोषणाबाजी केल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा देत प्रत्युत्तर दिले. सध्या महाविद्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अभाविपचा अध्यक्ष अलोक सिंग पुणे दौऱ्यावर आहे. मंगळवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात त्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घोषणांनंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांकडूनही संघटनेच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू असल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना शांत केले. या प्रकरणी पोलीन निरीक्षक प्रवीण चौगुले पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader