‘ लहान व मध्यम उद्योगांनी विकासाची विशिष्ट पातळी गाठल्यानंतर त्यांची वाढ खुंटलेली दिसते. आपल्याकडे तरूण लोकसंख्येचे प्रमाण खूप मोठे आहे. या लोकसंख्येला पुरेशा नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी या उद्योगांनी वाढीची ही सीमा ओलांडणे गरजेचे आहे,’ असे मत ‘पर्सिस्टंट सिस्ट्म्सि’ कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड’तर्फे ‘मार्कस् प्रायोर’, ‘अ‍ॅरोफाईन पॉलिमर्स’ आणि ‘अ‍ॅनॅलॉजिक ऑटोमेशन’ या कंपन्यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार’ देशपांडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, डॉ. गिरीश गुणे, शशांक इनामदार या वेळी उपस्थित होते.
या वेळी गणित अध्यापक मंडळ या संस्थेस तसेच अविनाश आडिगे व प्रतिभा दीक्षित यांना रोटरी मित्र पुरस्कार तर रवींद्र कात्रे, लखिचंद खिंवसरा व विश्वास चितळे यांना रोटरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देशपांडे म्हणाले, ‘‘लहान व मध्यम उद्योग पाच ते दहा कोटींपर्यंतचा विकास साधण्यात यशस्वी होतात. मात्र त्यानंतर उद्योगांत साचलेपण येते. हा टप्पा पार करता यावा यासाठी कंपनीच्या संस्थापकाने विकासाचे लक्ष निश्चित करायला हवे. उद्योगाला पुढे नेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संघ बांधणी, तांत्रिक प्रगती, योग्य तत्त्वांचे पालन आणि बिकट प्रसंगी सल्ला देऊ शकतील अशा जाणकार व्यक्तींशी वाढविलेला संपर्क या गोष्टी हे साचलेपण दूर करू शकतील.’’

Story img Loader