किरकोळ व्यापारी, वाहतूकदार, रिक्षाचालक, सेवा पुरवठादार यांच्या व्यवसायात २० टक्क्यांची घसरण

किरकोळ व्यापारी, छोटे वाहतूकदार, रिक्षाचालक, छोटे सेवा पुरवठादार यांना नोटाबंदीचा फटका बसला असून व्यवसायात दोन आठवडय़ांत साधारण २० टक्क्य़ांनी घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दोन आठवडय़ांनंतरही बाजारपेठांमध्ये शुकशुकाटच आहे.

[jwplayer 9AX3hgPE]

पाचशे आणि हजाराच्या नोटांवरील बंदीनंतर चलनात सुट्टय़ा पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायात दोन आठवडय़ांत घट झाली आहे. दोन आठवडय़ांनंतरही भाजी मंडई, किरकोळ विक्रेते, बाजारपेठा येथे मंदीच दिसत आहे. या दोन आठवडय़ाच्या कालावधीत एरवीच्या तुलनेत साधारण १५ ते २० टक्क्य़ांनी व्यवसायात घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मंडई आणि भाजीबाजारातील नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे एकावेळी भाज्या खरेदी करण्याचे प्रमाणही घटले आहे. याबाबत सचिन पाटील या किरकोळ बाजारातील भाजी विक्रेत्याने सांगितले, ‘सध्या भाजी चांगली आली आहे. पालेभाजीही चांगली आहे. मात्र तुलनेने विक्री कमी होते आहे. नेहमीचे ग्राहकही मोजकी आवश्यकतेपुरतीच भाजी घेत आहेत. एकदम भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्यामुळे मार्केट यार्डमधून खरेदीही नेहमीपेक्षा कमी करत आहे.’

रिक्षाचालकांनाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. रिक्षासाठी बहुतेक वेळा रोख रक्कमच द्यावी लागत असल्यामुळे त्याकडे प्रवाशांचा ओढा कमी आहे. याबाबत राघव कांबळे या कर्वे रस्त्यावरील रिक्षाचालकाने सांगितले, ‘सकाळी ऑफिस भरण्याच्यावेळी आणि सायंकाळी अधिक प्रवासी मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची संख्या कमी झाली आहे. दिवसाला नेहमीपेक्षा ७ ते ८ प्रवासीही कमी मिळतात. त्याचप्रमाणे दूरवरील भाडे असेल, तरीही सुट्टे पैसे नसले तर घेऊन जाणे शक्य होत नाही.’ एसटीच्या प्रवासीसंख्येतही साधारण २० टक्क्य़ांची घट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

व्यापाऱ्यांबरोबरच विविध सेवा देणाऱ्यांवरही नोटाबंदीचा परिणाम झाला आहे.

पॅकर्स अँड मूव्हर्स, पेस्ट कंट्रोल करणारे, घरांचे व्यवहार करणारे दलाल यांच्याही व्यवसायात घट झाली आहे. याबाबत पॅकर्स अँड मूव्हर्स व्यवसायातील राजेश शिंदे यांनी सांगितले, ‘दोन आठवडय़ात नवी काही कामे फारशी मिळालेली नाहीत. पैसे धनादेशाच्या माध्यमातून स्वीकारण्याची तयारी दाखवली, तरीही लोक फारसे तयार होत नाहीत. आधी धनादेश देण्याची तयारी नसते. आम्हालाही आमच्याकडील कामगार, चालक यांना पैसे द्यावे लागतात. ते रोखीत द्यावे लागतात. त्याचीही पंचाईत झाली आहे.’

गेल्या आठवडाभरात घरांचे अंतिम टप्प्यात आलेले तीन व्यवहार ग्राहकांनी पुढे ढकलल्याचे सागर साळुंखे यांनी सांगितले.

[jwplayer PuSvtqP8]

Story img Loader