केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष तसेच विविध संस्था संघटनांनी शड्डू ठोकले आहेत.
देशभरातील ६५ शहरांमधून िपपरी-चिंचवडची ‘बेस्ट सिटी’ म्हणून निवड होते. मात्र, ‘स्मार्ट सिटी’तून डच्चू कसा काय मिळू शकतो, असा मुद्दा उपस्थित करत आधीचा निर्णय मागे घेऊन िपपरीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करण्याच्या मागणीने शहरात जोर धरला आहे. अन्यथा, सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरू केली आहे. िपपरी पालिकेच्या सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व पक्षीयांचा समावेश असलेली ‘स्वाभिमान’ समितीची स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली खराळवाडीत झालेल्या बैठकीत सचिन साठे, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, अतुल शितोळे, नाना काटे, विनोद नढे, अनंत कोऱ्हाळे, मारुती भापकर, प्रकाश जाधव तसेच विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तथापि, भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येण्याचे टाळले. पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटीच्या विषयात भाजप सरकारने राजकारण केले असून शहरवासियांची फसवणूक केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. शिवसेनेने यापूर्वीच राज्य शासनाकडे बोट दाखवून आपले अंग काढून घेतले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या विषयात भाजप ‘एकाकी’ आहे. सरकारच्या निर्णयामुळे शहर भाजपचे नेते तोंडघशी पडले आहेत. बापट यांच्या माध्यमातूनच मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी सावध भूमिका शहर भाजपने घेतली आहे.

Story img Loader