केंद्र सरकारच्या बहुचíचत स्मार्ट सिटी अभियानात परिसर विकास योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडीची निवड करण्यात आली आहे. मात्र, हा भाग निवडण्यात आल्यामुळे नगरसेवकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. महापालिका प्रशासनाने नगरसेवकांमध्ये स्मार्ट भांडणे लावू नयेत. त्याऐवजी शहराच्या चारही भागांमध्ये परिसर विकासाची योजना राबवावी, असा आदेश सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला दिला.
सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात घरोघरी फॉर्म वाटण्यास आयुक्तांनी सांगितले आहे का, त्या उपक्रमासाठीचे प्रभाग कोणी निवडले, पुणे शहराच्या विकास आराखडय़ाप्रमाणे कोथरूड भाग सर्वाधिक विकसित झाला आहे. तरीही कोथरूडचा समावेश फॉर्ममध्ये का केला नाही, असे प्रश्न सभेत पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित केल्यानंतर या विषयावर अनेक सदस्यांची भाषणे झाली.
पूर्व भागातील नगरसेवकांनी बुधवारी सकाळी आयुक्तांची भेट घेतली. शहराच्या चारही भागात स्मार्ट सिटी अंतर्गत परिसर विकास योजना राबविली गेली पाहिजे. जो भाग निवडण्यात आला आहे त्यावरून नगरसेवकांमध्ये स्मार्ट वाद लावण्यापेक्षा प्रत्येक प्रभाग स्मार्ट करा. त्यामुळे शहरच स्मार्ट होईल, अशी सूचना या वेळी चेतन तुपे यांनी केली. शहराच्या पूर्व भागावर अन्याय झाला आहे. हडपसरने शहराच्या विकासात योगदान दिले आहे. त्यामुळे या भागाकडे लक्ष द्या, अशी मागणी विजय देशमुख, माजी महापौर चंचला कोंद्रे तसेच वैशाली बनकर यांनी या वेळी केली.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका प्रशासन ठप्प झाले आहे. विकास कामांकडे प्रशासनाचे लक्ष नाही. या अभियानात २०० कोटी रुपये मिळणार आहे; पण अभियानाची चर्चा मात्र खूप आहे. लोकसंख्येनुसार या शहराला अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी विशाल तांबे यांनी केली. किशोर िशदे, दत्ता बहिरट, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेता शंकर केमसे यांचीही भाषणे झाली. स्मार्ट सिटीवर चर्चा सुरू असताना भाजपचे नगरसेवक सभागृहातून बाहेर निघून गेले. याकडे काँग्रेसचे गटनेता व विरोधी पक्षनेता अरिवद िशदे यांनी सभेचे लक्ष वेधले. स्मार्ट भाग निवडण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती. या अभियानात नवीन कामे वा शहरासाठी कोणतेही प्रकल्प होणार नाहीत, अशी टीका उपमहापौर आबा बागुल यांनी केली.
शहराच्या गरजेप्रमाणे योजना राबवणार – आयुक्त
या चर्चेवर निवेदन करताना पालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, की स्मार्ट सिटीची योजना संपूर्ण शहरात राबवली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारणा, झोपडपट्टय़ांचा विकास आदी अनेक कामे केली जाणार आहेत. शहराच्या गरजेप्रमाणे योजना राबवता येणार आहेत. स्मार्ट एरिया नव्हे तर स्मार्ट सिटी मिशन आहे. शहरातील कमी जागेत चांगल्या योजना करण्यासाठी केंद्राच्या निकषांप्रमाणे क्षेत्र विकासाची संकल्पना मांडण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांनी औंध, बाणेर, बालेवाडीला पसंती दिली आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्पात ९८ शहरांपकी १० ते १५ शहरांची निवड होणार आहे. त्यात पुण्याचा समावेश होणे गरजचे आहे.

Story img Loader