‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला विनंती करतील, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी निगडीत बोलताना स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या भुयारी पुलाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरीचे आयुक्त राजीव जाधव, पीएमआरडीएचे मुख्याधिकारी महेश झगडे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरीला वगळणे भाग पडले, काही अडचणी आल्या असतील. मात्र, मुख्यमंत्री पिंपरीसाठी सकारात्मक होते. पुणे-पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जो जादा खर्च येईल, ते पैसे राज्य सरकार देईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पिंपरीचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त असावा, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. त्यामुळे सरकारने अन्याय केला, असे म्हणण्यात अर्थ नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारशी बोलणार आहेत. पिंपरीवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊ. शिवसेनेच्या खासदारांनी राज्य सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्याशी आपल्याला काही देणे-घेणे नाही. त्यांनी दिल्लीत बसून स्वत:चे वजन वापरावे आणि ‘स्मार्ट सिटी’त शहराचा समावेश करून आणावा, अशी टिप्पणी त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा