महापालिकेतर्फे सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांच्या सहभागाचे दोन टप्पे यशस्वी रीत्या पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे. ‘स्मार्ट पुण्याच्या निर्मितीमध्ये स्मार्ट नागरिक म्हणून माझा सहभाग’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मराठी वा इंग्रजीतील आठशे ते एक हजार शब्दांचा निबंध या स्पर्धेसाठी सादर करायचा आहे.
स्मार्ट सिटी अभियानात पुणेकर नागरिकांनी पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकविध सूचना महापालिकेला केल्या तसेच महापालिकेने कोणती कामे प्राधान्याने करावीत, याचा क्रमही १३ लाख ४८ हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदवला. यातील ७४ टक्के नागरिक हे शहरातील तर २० टक्के नागरिक पुण्याबाहेरील आणि सहा टक्के नागरिक भारताबाहेरील होते. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे झेन्सॉर टेक्नॉलॉजी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केले. त्यानुसार आलेल्या एकूण सूचनांपैकी ३२ टक्के नागरिकांनी वाहतूक व दळणवळण या विषयाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक वाहतुकीसाठी अधिक चांगल्या सुविधा असाव्यात, रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पार्किंगच्या सुविधा अधिक चांगल्या असाव्यात, अतिक्रमण विरहित पादचारी मार्ग असावेत, रस्त्यांचे जाळे चांगले असावे आदी सूचना नागरिकांनी केल्या आहेत.
स्मार्ट सिटीसाठी मी काय करू शकतो, या विषयावरील निबंध आता तिसऱ्या टप्प्यात मागवण्यात आले आहेत. अठरा वर्षांपर्यंतचा पहिला गट आणि अठरा वर्षांवरील नागरिकांचा दुसरा गट असे दोन गट या स्पर्धेसाठी असून हे निबंध ३१ ऑक्टोबपर्यंत सादर करायचे आहेत. विजेत्यांची नावे पुणे स्मार्टसिटी या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. दोन्ही गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देण्यात येणार आहे. निबंध http://www.punesmartcity.in या संकेतस्थळावर पाठवता येतील किंवा punesmartcity@gmail.com या ईमेलवर ऑनलाइन स्वरूपातही निबंध पाठवता येतील. लेखी निबंध पाकिटबंद स्वरूपात स्मार्ट सिटी विभाग, उपायुक्त (विशेष), पुणे महापालिका भवन, मुख्य इमारत, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत द्यावेत, असेही कळवण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी: नागरिक सहभागाचा तिसरा टप्पा सुरू
‘स्मार्ट पुण्याच्या निर्मितीमध्ये स्मार्ट नागरिक म्हणून माझा सहभाग’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली...
First published on: 20-10-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart city phase iii citizen participation