केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश होण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीचे संकलन करून आवश्यक माहिती व अहवाल त्वरित सादर करा असा आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी सर्व खाते प्रमुखांना दिले.
स्मार्ट सिटी योजनेतील सहभागासाठी प्रवेशिका पाठवायच्या असून विविध खात्यांच्या माहितीचा अहवाल १७ जुलै पर्यंत केंद्राला सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने शनिवारी आयुक्तांनी खाते प्रमुखांची बैठक घेतली. या वेळी माहिती देताना आयुक्त म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील ४३ महापालिका व नगरपालिकांकडून केंद्राने प्रवेशिका मागवल्या आहेत. तेरा विविध मुद्यांवरील महापालिकेच्या सद्य:स्थितीचे अहवाल असे या प्रवेशिकेचे स्वरूप आहे. या अहवलांच्या आधारे स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्यातील दहा शहरांची निवड केली जाईल.
लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा व वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण, गरिबांसाठीची घरे, ई गव्हर्नन्स, पर्यावरण, महिला, मुले व ज्येष्ठांची सुरक्षितता आदींबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या योजना, त्या बाबतच्या विस्तारीकरणाच्या योजना आणि भविष्यातील वाटचाल या संबंधीचे जे नियोजन करण्यात आले आहे त्याची दखल केंद्राकडून घेतली जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, उत्पन्नाचा आलेख, लेखा परीक्षणाचा अहवाल, वसुली, भांडवली कामांसाठी निधीची उपलब्धता, नेहरू योजनेतील कामे, स्वच्छ भारत अभियानातील नागरिकांचा सहभाग याचाही अहवाल सादर करायचा आहे. आर्थिक क्षमता आणि योजना राबवणारे शहर ही स्मार्ट सिटी योजनेसाठीची प्रमुख कसोटी असेल, अशीही माहिती आयुक्तांनी दिली.