स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून शहरातील सुधारणांबाबत मते व सूचना संकलित करण्याचे काम सुरू असून शहरातील किमान पाच लाख नागरिकांकडून ही माहिती घेतली जाणार आहे. शहरात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्याबात नागरिकांकडूनच मते घेऊन त्यानुसार शहराचा आराखडा केंद्राला सादर केला जाणार असल्यामुळे नागरिकांच्या सूचनांना या अभियानात सर्वाधिक महत्त्व असल्याचे महापालिका उपायुक्त (विशेष) अनिल पवार यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी व अर्ज भरून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, समूह संघटिका आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सध्या घरोघरी जात आहेत. अर्ज भरून देण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पेटय़ाही ठेवण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अभियानात केंद्राकडून अनुदान मिळणार आहे तसेच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, महापालिकेचा निधी यातून शहरात अनेक विकासकामे करणे शक्य होणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक खासगी भागीदारी, बँकांकडून मिळणारे अल्प व्याजदरातील कर्ज या माध्यमातूनही विकासकामे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियान पुण्यासाठी महत्त्वाचे असून नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे पवार यांनी सांगितले.
शहरविकासासाठी वाहतूक, रस्ते, रोजगार आदी बारा क्षेत्र महापालिकेने निश्चित केली आहेत. त्यातील कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे यासंबंधी नागरिकांकडून सूचना घेतल्या जात आहेत. आलेल्या सूचनांनुसार नागरिकांना शहरातील कोणते प्रश्न प्राधान्याने सुटावेत असे वाटते याचे संकलन केले जाईल, त्यानुसार शहराचा आराखडा तयार होईल आणि तो केंद्राला सादर केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी अभियानात अधिकाधिक संख्येने भाग घेऊन त्यांच्या सूचना द्याव्यात तसेच सर्वेक्षण करणाऱ्यांची वाट न पाहता भरलेले अर्ज क्षेत्रीय कार्यालयात आणून द्यावेत, असेही आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांचा सहभाग अभियान
नागरिकांकडून माहिती भरून घेतली जात असताना नागरिकाचे नाव, जन्म दिनांक, राहत असलेल्या भागाचा पिनकोड क्रमांक, ई मेल आयडी, मोबाइल क्रमांक हा तपशील घेतला जात आहे. त्या बरोबरच पुण्याविषयीचे आपले स्वप्न काय आहे अशीही विचारणा सर्वेक्षण करणाऱ्यांकडून करण्यात येत असून त्याचीही नोंद अर्जात करून घेतली जात आहे. तसेच या शहरात आपण सध्या कोणत्या तीन मोठय़ा समस्यांना समोरे जात आहात याबातही मत विचारले जात असून अशा तीन प्रमुख समस्या नागरिकांनी सांगाव्यात अशी अपेक्षा आहे.
स्मार्ट सिटी अभियान.. एक दृष्टिक्षेप
– २५ जून रोजी केंद्रामार्फत अभियानाची घोषणा
– पुढील पाच वर्षांत १०० स्मार्ट शहरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट
– प्रत्येक शहराला दरवर्षी केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान
– २७ ऑगस्ट रोजी केंद्राकडून पुण्याची निवड
– दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या सहभागासाठी महापालिकेचे अभियान
– नागरिकांकडून लेखी स्वरूपातील मतांचे व सूचनांचे संकलन

Story img Loader