‘जीमेल आयडी’चा वापर करून सुविधा वापरता येणार
स्मार्ट शहर म्हणून विकसित होत असलेल्या पुणे शहरात गुगलकडून मंगळवार (२७ नोव्हेंबर) पासून ‘नेबरली’ हे अॅप दाखल केले जाणार असून, त्यामुळे शहरातील अँड्रॉईड मोबाइलधारकांना स्मार्ट शेजार मिळणार आहे. नेबरली अॅपची सुविधा मिळणारे पुणे हे देशातील सातवे शहर आहे. मुंबई, जयपूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, म्हैसूर, कोची आणि कोईमतूर या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
येत्या पंधरा दिवसांत देशातील सुमारे सहाशे प्रमुख शहांमध्ये नेबरली अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगल नेबरलीचे सीनिअर प्रॉडक्ट मॅनेजर बेन फॉनर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. गुगल इंडियाचे कम्युनिटी मॅनेजर आशिष शारदा या वेळी उपस्थित होते.
बेन फॉनर म्हणाले, नागरिकांना त्यांच्या वास्तव्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी कोणतीही सेवासुविधा हवी असल्यास त्या बाबत सर्वप्रथम शेजारील व्यक्तीकडे विचारणा केली जाते. आता स्मार्ट फोनने व्यक्तींचे आयुष्य व्यापल्यामुळे या शेजाऱ्याचे काम गुगलचे नेबरली अॅप करणार आहे. मुंबई येथे हे अॅप दाखल केल्यानंतर पावसाळय़ातील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी, उत्सवाच्या काळात रस्त्यांवरील रहदारीची माहिती घेण्यासाठी या अॅपचा वापर बहुसंख्य नागरिकांनी केल्याचे आढळून आले. अॅपद्वारे प्रश्न विचारून सुमारे एक ते पाच किलोमीटरच्या परिघातील व्यक्तींकडून माहिती मिळवणे शक्य आहे. ही सुविधा मोफत असून माहिती प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरणे, स्वत:चे छायाचित्र वापरणे बंधनकारक नाही.
आशिष शारदा म्हणाले, आयटी कंपन्या आणि शिक्षणाचे प्रमुख केंद्र अशी पुणे शहराची ओळख असल्याने अनेक तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी येथे येतात. त्या वेळी दैनंदिन गरजेच्या सेवासुविधांबाबत माहिती मिळवण्यासाठी देखील त्यांना या अॅपचा उपयोग होणार आहे. घर, कार्यालय आणि इतर एक अशी तीन ठिकाणे शेजार म्हणून नोंदवणे शक्य आहे. या अॅपचा वापर मराठी भाषेत करता येणे शक्य आहे. जयपूर शहरात अॅपचा वापर करणारे पन्नास टक्के नागरिक स्थानिक भाषेची निवड करतात.
दृष्टिक्षेपात ‘नेबरली’
* ‘नेबरली’ अॅप अँड्रॉईड फोनवर मोफत डाऊनलोड करणे शक्य आहे.
* जीमेल आयडीचा वापर करून सुविधा वापरता येणार.
* घर, कार्यालय आणि इतर असे तीन शेजार निवडणे शक्य.
* हवी असलेली माहिती प्रश्नस्वरूपात विचारा.
* पाच किलोमीटरच्या परिघातील शेजारी उत्तर देऊ शकतात.
* वैयक्तिक माहिती भरणे बंधनकारक नाही.