पुणे : सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने चित्रपट धोरण समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये चित्रीकरणाच्या, प्रसारणाच्या तसेच आस्वादनाच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याने त्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने चित्रपट धोरण समिती गठीत केली असून या समितीच्या अध्यक्षपदी स्मिता ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयास मान्यता दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या समितीमध्ये प्रवीण तरडे, मंगेश देसाई, दिगंबर नाईक, नितेश नांदगावकर, प्रभाकर मोरे, सविता मालपेकर, गार्गी फुले, आसावरी जोशी, प्रिया बेर्डे, निशिगंधा वाड, मेघा धाडे, प्रिया कृष्णस्वामी, नितीन वैद्य, श्रीपाद जोशी, विशाल भारद्वाज, रमेश तौरानी, उज्ज्वल निरगुडकर आणि अशोक राणे यांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्य संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य आहेत.

हे ही वाचा…परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी खुल्या गटातील २६ विद्यार्थ्यांची निवड; पीएच.डी.साठी एकमेव विद्यार्थी

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत छायाचित्रण, संकलन, ध्वनी, रंगभूषा, वेशभूषा, डबिंग, व्हीएफएक्स, ॲनिमेशन या विभागातील अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) मदतीने सुरू करण्याबाबत सूचना करणे ही या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. के‌वळ मनोरंजनाचे साधन नव्हे तर चित्रपट हा सृजनशील अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळांच्या आयोजनाची सूचना, आठवड्यातून एकदाच वापर केल्या जाणाऱ्या नाट्यगृहांचा एकपडदा चित्रपटगृह म्हणून चित्रपटासाठी उपयोग करण्यासंदर्भात सूचना करणे यांसह विविध अपेक्षांची कार्यकक्षा या समितीकडून निश्चित करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita thackeray appointed as chairperson of ministry of culture film policy committee pune print news vvk 10 sud 02