धूम्रपानामुळे देशात दरवर्षी सुमारे दहा लाख नागरिकांचा बळी जातो. त्यातही धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना धूम्रपान करणाऱ्या पुरुषांपेक्षा तिपटीने अधिक धोका असतो. धूम्रपानामुळे मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत ३६ टक्क्य़ांनी जास्त असते, अशी धक्कादायक माहिती प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ आणि मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी पुण्यात झाला. या वेळी केलेल्या बीजभाषणात डॉ. बडवे बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर उपस्थित होते.
पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बडवे, डॉ. नंदकुमार लाड, डॉ. अमित मायदेव आणि डॉ. सुंदरम् नटराजन आदींचा गौरव करण्यात आला. आयएमए- पुणेच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे, माजी अध्यक्ष डॉ. भारती ढोरे-पाटील या वेळी उपस्थित होत्या.   
डॉ. बडवे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात दर एक लाख लोकसंख्येमागे ४५ ते ४८ जणांना कर्करोग असतो. तर शहरात हे प्रमाण दर लाख नागरिकांमागे ९५ ते शंभर कर्करोगग्रस्त असे आहे. स्त्रियांमधील ‘सव्र्हायकल कॅन्सर’ म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग कमी होत आहे तर स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी संक्रमण, तंबाखू आणि स्थूलता या तीन घटकांचे प्राबल्य १९९० सालापासून सतत वाढताना दिसत आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोग आणि इतर आजारांमुळे देशात दरवर्षी सुमारे दहा लाख नागरिक मृत्युमुखी पडतात. त्यातही धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना धूम्रपान करणाऱ्या पुरुषांपेक्षा तिपटीने अधिक धोका असतो.’’
डॉ. जामकर यांनी सांगितले की,‘‘वैद्यकीय अभ्यासक्रमात संज्ञापन कौशल्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर्स रुग्णांशी शास्त्रीय भाषेत बोलत असल्याने रुग्णांना ती भाषा कळत नाही. रुग्णांशी संवाद कसा साधावा, वाईट बातमी असेल तरी ती कशी पुरवावी याचे प्रशिक्षण डॉक्टरांना देणे आवश्यक आहे. शिकून बाहेर पडणारे डॉक्टर्स प्रत्यक्ष आणीबाणीचे प्रसंग हाताळण्यासाठी कितपत सक्षम आहेत याकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. काही वेळा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्णांचे नुकसान होऊ शकते. अशा घटना विरळ असल्या तरी संबंधित रुग्णांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र समित्या तयार करणे गरजेचे आहे.’’