शहरातील कचरा उचलणे तसेच स्वच्छतेसंबंधीच्या कामांची पाहणी करून लवकरच सर्व यंत्रणा सुरळीत केली जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील कचरा व स्वच्छतेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्या सादर केल्या. महापौर चंचला कोद्रे, आमदार जयदेव गायकवाड, सभागृहनेता सुभाष जगताप यांच्यासह पक्षाचे काही नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या चर्चेत आयुक्त म्हणाले की, स्वच्छतेच्या अनुषंगाने येत्या १० ऑक्टोबपर्यंत संपूर्ण शहराचा पाहणी दौरा करून त्यानंतर सर्व यंत्रणा सुरळीत केली जाईल.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा तसेच मोकाट कुत्र्यांचा, स्वच्छतागृहांचा प्रश्न निर्माण झाला असून त्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे यावेळी आयुक्तांना सांगण्यात आले. प्रमुख रस्त्यांची स्वच्छता रविवारीदेखील झाली पाहिजे, तसेच ज्या सार्वजनिक ठिकाणी सातत्याने कचरा पडतो त्या ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत वेगळे नियोजन केले पाहिजे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली.
 ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना ज्या बादल्या दिल्या जातात त्यांचा दर्जा तपासण्याचीही गरज आहे. भाजी मंडई विकसित करताना रस्त्यांच्या आतील बाजूस असणाऱ्या जागा शोधाव्यात, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न संपूर्ण शहरात निर्माण झाला असून त्याबाबतही तातडीने प्रभावी उपाययोजना करावी, अशाही मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या.

Story img Loader