गेल्या वर्षी देशात सोन्याची तस्करी वाढत असलेली दिसून येत असताना सोने तस्करांसाठी पुण्यातील लोहगाव विमानतळ हे तस्करीचा मार्ग ठरत आहे. सोने आणण्यासाठी तस्करांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असून, पकडलेले सर्वजण हे किरकोळ मोबदल्यात सोन्याची वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या व्यक्तींकडून सोने घेणाऱ्या व्यक्ती या प्रामुख्याने मुंबई आणि दक्षिण भारतातील असताना देखील हे सोने पुणे विमानतळावर घेऊन आल्या होत्या.
आखाती देशातून तस्करीचे सोने भारतात आणण्यासाठी पूर्वी मुंबई विमानतळाचा वापर केला जात होता. मात्र, अलीकडे  मुंबई व इतर आंतरराष्ट्रीय विमातळावरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यामुळे सीमा शुल्क न भरता सोने घेऊन येण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे याला पर्याय म्हणून सोने तस्करांकडून पुण्यातील लोहगाव विमानतळाचा वापर केला जाऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात सोन्याच्या तस्करीसाठी आणलेले दोन कोटीपेक्षा जास्त सोने सीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर जप्त केले आहे. मुंबई व दक्षिण भारतातील स्मगलरकडून मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून सोने तस्करीसाठी लोहगाव विमानतळाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
सोने घेऊन येताना वेगवेगळ्या क्लृप्त्या
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुबईहून सोने घेऊन येणाऱ्या हसन जमालुद्दीन खान आणि राजा मेहंदी सय्यद यांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३५ लाख ५० हजार रुपयांचे १२७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी अन्न शिजवण्यासाठी असणाऱ्या हॉटप्लेटचा वापर केला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये खजुरामध्ये सोन्याच्या लगड करून लपवून आणलेले सोने पकडण्यात आले. त्याच बरोबर यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवडय़ात एका व्यक्तीला निरोधमध्ये लपवून २१ लाख रुपये किमतीचे सातशे ग्रॅम सोने आणताना अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बुटाच्या सोलमध्ये अर्धा किलोची सोन्याची बिस्कीटे घेऊन येताना एका व्यक्तीला अटक केली होती. पुन्हा आठ दिवसांनंतर (१३ मार्च ) एका व्यक्तीला प्रवाशी बॅगला गुंडाळलेल्या वायरमधील तार सोन्याची असल्याचे दिसून आले आहे.
सोन्याची वाहतूक करणारे पुण्याबाहेरचे
सोन्याची वाहतूक करणारे आणि तस्करी करणारे पुण्याबाहेरचे असतानाही त्यांच्याकडून पुणे लोहगाव विमानतळाचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. सोने घेऊन येताना पकडण्यात आलेल्या व्यक्तींचा वापर हा फक्त सोन्याची ‘वाहतूक’  करण्यासाठी करण्यात येतो. या पकडण्यात आलेल्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती बेताची असते. या व्यक्तींना एका वेळेस सोने घेऊन येण्यासाठी विमानाचे तिकीट आणि साधारण पाच ते दहा हजार रुपये दिले जातात. सोने घेऊन येणारे आरोपी हे मुंबई, कर्नाटक, केरळ या भागातील राहणारे असून त्यांच्याकडून सोने स्वीकारणारे सुद्धा सर्वजण पुण्याबाहेरचे आहेत. दुबईमार्गे पुणे विमानतळावर सोने आणून त्यानंतर मुंबई व इतरत्र पाठविण्यात येते, अशी माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तस्करांना किलोमागे तीन लाखांचा नफा
गेल्या वर्षांत भारतात सोन्यावरील आयात कर हा शुन्यावरून दहा टक्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे परदेशात भारतापेक्षा कमी दरात सोने मिळते. आखाती देशात सोने खरेदी करून ते बेकायदेशीरपणे भारतात घेऊन आल्यास एका किलोमागे साधारण तस्कराला तीन लाख रुपये नफा होतो. देशातील सोने तस्करीची आकडेवारी पाहिल्यास २०१३ मध्ये मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी झाल्याचे समोर आले आहे. २०१२ मध्ये देशात २२ कोटीचे तस्करीचे सोने पकडले होते. त्यात २०१३ मध्ये कित्येक पटीने वाढ झाली आणि या वर्षी २७१ कोटींचे सोने देशात पकडण्यात आले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (डब्ल्यूजीसी) च्या अहवालानुसार सोन्यावरील आयात कराचे (इम्पोर्ट डय़ुटी) प्रमाण असेच राहिले तर सोन्याच्या तस्करीत वाढ होईल, अशा अंदाज वर्तविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा