थंडीवाऱ्यात, वादळात, हिमवर्षांवात, प्रसंगी उष्णतेच्या लाटेतही आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांनी दिवाळीचा आनंद घ्यावा या जाणिवेतून पुण्यातील ‘स्नेहसेवा’ संस्था गेली पंचवीस वर्षे काम करत असून यंदाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छापत्रांसह ‘स्नेहसेवा’ची मिठाई सीमेवरील सहा हजार सैनिकांपर्यंत पोहोचणार आहे.
घरादारापासून दूर राहून अखंड सजग राहत आपल्या देशाचे रक्षण करणारे सीमेवरचे जवान दिवाळी कशी साजरी करत असतील आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, या जाणिवेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. दरवर्षी पाच ते सहा हजार जवानांना पुण्याच्या चितळे बंधूंची मिठाई आणि त्याच्या बरोबर शुभेच्छापत्र देण्याचा हा उपक्रम स्नेहसेवातर्फे राबवला जात असल्याचे संस्थेच्या सैनिक स्नेहप्रकल्पाचे प्रमुख उदय गडकरी यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही भेट जवानांच्या हातात पडली पाहिजे हा कटाक्ष असतो आणि त्यासाठी उपक्रमाची तयारी खूप आधीपासूनच केली जाते. उपक्रमाच्या पहिल्या वर्षांपासून संस्था सांगेल तेवढी मिठाई चितळे बंधूंकडून अगदी अल्प दरात दिली जात आहे. उपक्रमासाठी येणाऱ्या देणग्यांमध्ये पन्नास-शंभर रुपयांपासून काही हजारांपर्यंतच्या रकमा असतात.
सीमेपर्यंत मिठाई पाठवण्यासाठीचे वेळापत्रक पाहता कार्यकर्त्यांना खूप आधी तयारी सुरू करावी लागते. यंदाही सीमेवरील विविध बटालियनच्या अधिकाऱ्यांना पुण्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांना मिठाई देण्याचा कार्यक्रम २६, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्या शिवाय अडीच हजार पुडे विमानाने थेट गोहत्तीला आणि तेथून पुढे सीमेवर जाणार आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील तीस शाळांमधील पाच ते सहा हजार विद्यार्थी दरवर्षी जवानांसाठी शुभेच्छापत्र तयार करतात. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून आणि कलेतून तयार झालेली ही शुभेच्छापत्र खूपच देखणी असतात आणि त्यांनी जवानांच्या प्रती व्यक्त केलेल्या भावनाही खूप बोलक्या असतात.
या उपक्रमासाठी वास्तुरचनाकार कुमार बडवे यांचे मोठे साहाय्य गेली अनेक वर्षे मिळत आहे. ते स्नेहसेवाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ भडभडे यांनीही यंदा उपक्रमासाठी भरीव आर्थिक मदत मिळवून दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा