लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : गंभीर गुन्ह्यांची उकल, स्फोटके, तसेच अमली पदार्थांचा शोध घेण्यात पोलीस दलातील श्वान महत्वाची भूमिका बजावतात. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकात दहा वर्षे सेवा बजाविणाऱ्या राधा नावाच्या श्वानाचे नुकतेच निधन झाले. पोलीस दलातील सर्वांना तिचा लळा होता. राधाच्या मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.

पोलीस दलातील श्वानांची निवड काटेकोर निकषांची पूर्तता करुन केली जाते. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस दलात श्वानांचा समावेश केला जातो. प्रशिक्षण कालावधीत त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) पोलीस श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. श्वान पथकात लॅब्रोडोर, जर्मन शेफर्ड या जातीचे श्वान कार्यरत असतात. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बाँम्ब शोधक नाशक पथकात १ नोव्हेंबर २००९ रोजी राधा नावाच्या श्वानाचा समावेश करण्यात आला. तिचे नामकरण पोलिसांनी केले. सहायक फौजदार राम जगताप, हवालदार रवींद्र बनसोडे यांनी राधाचे हस्तक (हँडलर) म्हणून काम पाहिले. प्रशिक्षण पूर्ण करुन आलेल्या राधा शांत स्वभावाची असल्याने सर्वांना तिचा लळा लागला. पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस श्वानांच्या स्पर्धेत राधाने सहा वेळा पदक पटकाविले. महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाल्यात राधा सहभागी झाली होती.

आणखी वाचा-पुणे: कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटींची फसवणूक

राधाने दहा वर्षे बाँम्ब शोधक नाशक पथकात अविरत सेवा केली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात राधा सहभागी झाली होती. स्फोटकांचा शोध घेण्यात तिने नैपुण्य मिळवले होते. पोलीस दलातील श्वानांना दहा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात येते. राधाने पोलीस दलात दहा वर्षे अवितिरत सेवा बजावली. दहा वर्षांच्या सेवेनंतर तिला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी तिला निवृत्त करण्यात आले. सेवानिवृत्तीच्या दिवशी तिला भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यानंतर तिचा सांभाळ पोलीस दलातील निवृत्त हवालदार पोपटराव वाघमारे यांनी केला. राधाची प्रकृती खालावल्याने तिचा नुकताच मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस फौजदार राम जगताप यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sniffer dog radha of pune rural police bomb squad dies pune print news rbk 25 mrj
Show comments