पुणे : ओमायक्रॉन विषाणूच्या बीएफ.७ या प्रकारामुळे जगातील रुग्णसंख्या वाढत असताना आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात दाखल झालेल्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२ वर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दाखल झालेल्या प्रवासी सर्वेक्षणात या १२ रुग्णांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमधील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात २४ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली. सोमवारी (९ जानेवारी) सकाळपर्यंत राज्यातील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दोन लाख ८५ हजार ४८९ प्रवासी दाखल झाले. त्यांपैकी ६४४२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून १२ जणांना करोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – एकवीरा गडावर पोहोचा आता तीन मिनिटांत! रज्जू मार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त
१२ पैकी चार रुग्ण मुंबई, तीन रुग्ण पुणे, प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई, गोवा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील रहिवासी आहेत. सदर रुग्णांचे वैद्यकीय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णांना झालेला संसर्ग कोणत्या उपप्रकाराचा आहे, हे स्पष्ट होईल, असे राज्य साथरोग सर्वेक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.