अपंगत्वाचे प्रमाणपत्र वेळेत न मिळण्याच्या मुद्दय़ावरून आमदार बच्चू कडू यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना बुधवारी घेराव घालून त्यांचे कार्यालय सुमारे दोन तास ताब्यात घेतले. ससून रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या काही अपंग व्यक्तींना २०१५-१६ च्या तारखा मिळाल्या असून तारीख बदलून घेण्यासाठी पैसेही घेतले जात असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.  
कडू म्हणाले, ‘‘रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करता प्रमाणपत्र देण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी असल्याचे समजले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांच्याशी याविषयी  बोलणे झाले असून त्यांनी हे सॉफ्टवेअर दोन दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. दर दिवशी साठ अपंगांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे तसेच ज्या अपंग व्यक्तींना पुढील वर्षांच्या तारखा दिल्या गेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कँप आयोजित करण्याचे लेखी आश्वासन ससून रुग्णालयाने दिले आहे.’’  
गेले आठ दिवस ‘सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट ऑफ डिसअ‍ॅबिलिटी’ या संकेतस्थळाचा सव्‍‌र्हर डाऊन असल्यामुळे अपंग प्रमाणपत्र देता आले नसल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी रुग्णालयाची बाजू मांडताना सांगितले. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘संकेतस्थळ कार्यरत होताच प्रमाणपत्रे देणे सुरू करता येईल. यापुढे प्रमाणपत्रासाठी तारखा देणे बंद केले जाणार आहे. जशा व्यक्ती येतील त्याप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. अतिरिक्त व्यक्तींना शनिवार व रविवार कँप घेऊन प्रमाणपत्रे दिली जातील. ससूनमध्ये आठवडय़ाचे सहाही दिवस दररोज पंचवीस ते चाळीस अपंगत्व प्रमाणपत्रे दिली जातात. औंध जिल्हा रुग्णालयानेही अपंगत्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. औंध रुग्णालयाकडून याबाबत नगण्य काम होत असल्याने ससूनवर अतिरिक्त भार पडतो.’’   

Story img Loader