पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्वत:ची मंत्रीपदे घेतली आणि इतर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले, हा तर लोकशाहीचा खून आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसले पाहिजे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी चिंचवडला केली.
राज्याचे प्रशासन ठप्प पडले असून शिंदे, फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले आहेत, असे सांगत आता तरी मंत्रीमंडळ विस्तार आणि जिल्ह्यांना पालकमंत्री देण्याची सुबुध्दी पांडुरंग त्यांना देवो, अशी प्रार्थना केल्याचे पवारांनी यावेळी नमूद केले. शहर राष्ट्रवादीच्या ‘कार्यकर्त्यांशी संवाद’ मेळाव्यात पवार बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, मंगला कदम, अपर्णा डोके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम सुरू होते. मात्र, सरकार पाडून महाराष्ट्राला अस्थिर करण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री आहेत. अशा मंत्रीमंडळाचा राज्यासाठी काडीचाही उपयोग नाही. इतरांनी तुमच्या दोघांकडे फक्त बघत बसायचे की, तुम्ही दिल्लीला कितीवेळा जाता ते मोजायचे. मुख्यमंत्री नुसतीच दिल्लीवारी करत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, याची नेमकी अडचण त्यांनी जनतेला सांगितली पाहिजे. मंत्रीपदाची आस अनेक आमदारांना आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी. पालकमंत्री नाहीत म्हणून जिल्हास्तरीय महत्त्वाचे निर्णय रखडलेले आहेत. सरकारच्या गोंधळी कारभारामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. यातून मार्ग निघेल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. आता खऱ्या अर्थाने ‘कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र’, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
पवार म्हणाले, ‘ नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक घेण्याचा निर्णय या सरकारने घेतला. फक्त नगराध्यक्षच का?, शहरांमध्ये महापौर, राज्यातून मुख्यमंत्री व देशातून पंतप्रधानही थेट जनतेतून निवडला पाहिजे. भाजपकडून स्वतच्या सोयीचे निर्णय घेतले जातात. राज्यात फोडाफोडी करून भाजपने १४५ चा आकडा ओलांडला. जनता हे सर्व पाहत असते. फोडाफोडीचे राजकारण जनतेला कधीही पटत नाही. जनता कोणाचीही सत्ता उलथवून टाकू शकते, हे यापूर्वी अनेकदा सिध्द झाले आहे.’
‘केंद्र सरकारची बनवाबनवी’
केंद्र सरकारकडून बनवाबनवी सुरू आहे. एकीकडे सवलती दिल्याचे सांगून दुसरीकडे बेसुमार महागाई वाढवली जात आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही टिकोजीरावांनी निलंबित सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा सपाटा लावला आहे. सर्वकाही आम्हीच करू, ही त्यांची कार्यपध्दती राज्यासाठी मारक आहे, असे अजित पवार म्हणाले.