पुणे महापालिकेत १५ दिवसांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. त्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात प्रत्येक राजकीय कार्यक्रम आणि आंदोलनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे.
आज भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी गिरीश बापट यांच्या घराबाहेर देखील भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर भाजपाचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, ”कधीही कोणत्याही राजकीय पार्टीला आंदोलनाबाबत विरोध करीत नाही. लोकशाही पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. माझ्या घराबाहेर देखील आमचे कार्यकर्ते जमले होते. काही करायचे नाही, असे त्यांना मी सांगितले होते. तसेच त्या आंदोलनामध्ये २० ते २५ पण कार्यकर्ते नव्हते. जर दुर्दैवाने काही गडबड झाली असती. तर आम्ही जशाच तसे उत्तर दिले असते.”
पुणे : भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर काँग्रेसकडून ‘माफी मागो’ आंदोलन
तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, मोदी अजिबात कोणाचीच माफी मागणार नाहीत. ”मोदींनी मुंबईच जे उदाहरण दिले आहे. ते खरं असून ज्या पद्धतीने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली. त्या सर्व कामगारांची काळजी अगोदरच केंद्र सरकारने घेतली होती. करोना काळात केंद्र सरकारला सहकार्य न केल्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागावी.”,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
महापालिका निवडणुकीत आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ –
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे किती नगरसेवक निवडून येतील? या प्रश्नावर गिरीश बापट म्हणाले की, महापालिकेच चित्र स्पष्ट असून तीन प्रभाग पद्धत आमच्या दृष्टीने चांगले झाले आहे. आमच्या नगरसेवकांनी करोना काळ आणि त्यानंतर देखील चांगले काम केले आहे. पण महापालिकेच्या चांगल्या कामांना अडथळा आणण्याचे काम शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. त्याचा जाब आम्ही निवडणुकीदरम्यान निश्चित विचारू आणि आम्ही १०० च्या पुढे निश्चित जाऊ, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने काल लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.त्यावर ते म्हणाले की, आमची तक्रार कुठे ही करा, दूध का दूध पाणी का पाणी..अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
राष्ट्रवादी पार्टी ही केवळ पाश्चिम महाराष्ट्रापुरती –
गुंड गजानन मारणे यांची पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी मनसे मधून राष्ट्रवादी मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रवेश केला.त्यापूर्वी भाजपात देखील काही गुंडाच्या पत्नीचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून आरोप करण्यात आले होते. तो प्रश्न विचारताच गिरीश बापट उत्तर देणे टाळत म्हणाले की, राष्ट्रवादी पार्टी ही केवळ पाश्चिम महाराष्ट्रापुरती आहे. ती काही देश पातळीवरच पार्टी नाही. त्यांचामध्ये परिवारवाद असून त्यांचामध्ये दोन चार जण निर्णय घेतात. ते कुठल्याही तत्त्वाला बांधिल नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला.