पुणे :‘समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या काही वसतिगृहांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वसतिगृहाचा कंत्राटदार कोण आहे, कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्या-मंत्र्याशी संबंधित आहे हे न पाहता, सुविधा न देणाऱ्या ठेकेदारांविरोधात थेट कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरसाट यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील २५० क्षमतेच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा…हंगामाच्या सुरुवातीला आंबेमोहोर महाग; किरकोळ बाजारात प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ

शिरसाट म्हणाले, ‘संभाजीनगर येथील वसतिगृहाची अवस्था पाहिली, तर अंगावर काटा येईल अशी परिस्थिती आहे. अनेक वसतिगृहांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत. स्वयंपाकगृह गलिच्छ आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दारे-खिडक्या तुटक्या अवस्थेत असून, सुरक्षेची वानवा आहे. बहुतांश ठिकाणी अशीच अवस्था असल्याच्या तक्रारीदेखील आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व वसतिगृहांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल.’

हेही वाचा…आळंदी: हिमालयातील नदी की इंद्रायणी? वारकऱ्यांच आरोग्य धोक्यात!

‘समाजकल्याण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पुण्यातील वसतिगृहांची पाहणी केली असता, येथील परिस्थिती समाधानकारक आहे. काही उणिवा निश्चितच आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खात्यामार्फत कोणती कामे प्रलंबित आहेत, याची माहिती घेण्यात आली असून, तातडीने कार्यवाही करण्यात येईल,’ असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social justice minister sanjay shirsat warned of action against contractors if they failing to provide facilities pune print news vvp 08 sud 02