व्हॉट्स अॅप, फेसबुक अशा समाजमाध्यमांचा शिरकाव कुटुंबांमध्ये झाला असला, तरी ही समाजमाध्यमे अनेक विवाहितांच्या सुखी संसारात बिब्बा घालू लागली आहेत. समाजमाध्यमे वापरणाऱ्या राजा-राणींचा संसार परस्परांतील वादामुळे अवघ्या वर्षभरात तुटल्याच्याही घटना घडल्या असून गेल्या वर्षभरात पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात विभक्त होण्यासाठी ३,४०० दावे दाखल झाले आहेत. समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे एकमेकांवर संशय घेऊन काडीमोड घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण कुटुंब न्यायालयातील वकिलांनीही नोंदविले आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर ओळखले जाते. शैक्षणिकदृष्टय़ा पुढारलेल्या पुणे शहरात साधारणपणे गेल्या दशकात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विस्तार झाला. बघता बघता सेवानिवृत्तांचे शहर अशी ओळख पुसली गेली आणि सर्वच क्षेत्रात शहर झपाटय़ाने विस्तारले. पुण्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने मोठय़ा संख्येने तरुणाई येथे आली. हातात भरभक्कम पैसा आल्यामुळे नातेसंबधांना न जुमनण्याची वृत्ती देखील वाढीस लागली आणि त्यातून विसंवाद वाढले. विशेषत: सुशिक्षित दाम्पत्यामध्ये एकमेकांपासून फारकत घेण्याचे प्रमाण वाढले.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात गेल्या वर्षी (सन २०१५) घटस्फोटाचे ३,४०० दावे दाखल झाले आहेत. त्यापैकी जवळपास तीस ते चाळीस टक्के दावे समाजमाध्यमांशी निगडित आहेत. व्हॉट्स अॅप, फेसबुक अशा माध्यमांच्या वापरामुळे एकमेकांवर संशय घेऊन थेट काडीमोड घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, असे निरीक्षण पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदवले.
गेल्या सहा वर्षांमध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांचे दावे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील पती-पत्नी एकमेकांपासून अगदी किरकोळ कारणांनी देखील फारकत घेतात. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या कक्षेत पुणे शहर, खडकी आणि लष्कर हा भाग येतो. तर पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील दावे शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल होतात. कौटुंबिक न्यायालयात दहा समुपदेशक आणि बावीस मध्यस्त हे दाम्पत्यांमधील विसंवाद किंवा वाद सोडविण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातून दावे दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत पती-पत्नीमधील वाद सहजतेने सोडविले जातात. परंतु जी दाम्पत्य नातेवाइकांपासून दूर राहतात त्यांच्यात वादाचे प्रमाण जास्त आहे. साधारणपणे कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेला घटस्फोटाचा दावा वर्षभरात मार्गी लागतो, अशीही माहिती अॅड. कवडे यांनी दिली.
—
पती-पत्नी हे दोघेही कमावते असतात. विशेषत: कामाच्या वेळेमुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. वादात आपण एक पाऊल मागे घेतले तर आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल अशी भावना सध्याच्या पिढीमध्ये आहे. त्यांच्या जाणिवा देखील फार तीक्ष्ण झाल्या आहेत. आर्थिक स्थैर्यामुळे ते ठामपणे मते मांडतात. त्यामुळे एकमेकांपासून विभक्त होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
मानसोपचारतज्ज्ञ आरती पेंडसे
कौटुंबिक दाव्यांची आकडेवारी
वर्ष दावे
२००८ २,११५
२००९ २,१८५
२०१० २,७१९
२०११ २,५००
२०१२ ३,६७८
२०१३ २,८९९
२०१४ २,९५१
२०१५ ३,४००
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा