पुणे : ‘एकीकडे प्रगतीचे नवनवीन मानके निर्माण होत आहेत. मात्र, आजही एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळत नाहीत. त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांकडे इतर रुग्ण जात नाहीत. वेश्याव्यवसायासारखे गंभीर सामाजिक प्रश्न गल्ल्यांमधून बाहेर पडून सगळीकडे पसरत चालले आहेत. समाजात अनेक प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत. जुने सामाजिक वास्तव आजही तसेच आहे. काही प्रमाणात या वास्तवाचे स्वरूप बदलत गेले असले, तरीही त्या गोष्टी घडतच आहेत. अशा कठीण परिस्थितीत समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
मानव्य संस्थेतर्फे विजया लवाटे यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्मयोगिनी विजयाताई लवाटे पुरस्कार डॉ. ईरा शहा यांना, तर स्वयंप्रेरित स्वयंसेवी संस्थेचे संतोष पवार यांना डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. या कार्यक्रमात मानव्य संस्थेच्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि विजयाताई लवाटे फेलोशिपप्राप्त टीम तरुणाईतर्फे ‘मैत्री मनाची ओळख शरीराची’ या विषयावरील सादरीकरण करण्यात आले. या वेळी मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘सामाजिक कार्यकर्ते हे समाजात दीपस्तंभासारखे असतात. समाजातल्या विविध स्तरांमध्ये वावरत असताना अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या समोर येत असतात. हे अनुभव लेखकांना मिळू शकत नाहीत. कार्यकर्त्यांनी मिळणारे हे जिवंत अनुभव लिहायला हवेत. आपल्याभोवती गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा काळात माणसाने माणसाशी माणसासारखे वागले, तर ही परिस्थिती पालटेल. अनेक प्रश्नही सुटतील.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त डॉ. विनया देसाई यांनी केले. समीर ढवळे यांनी आभार मानले.