फेसबुकवर कोणी बदनामीकारक मजकूर किंवा छायाचित्र टाकले तर ते काढण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेललासुद्धा तब्बल चोवीस तास लागतात, पण तोवर या मजकुरामुळे व्हायचा तो वाईट परिणाम झालेला असतो. पण आता असा मजकूर तातडीने म्हणजेच पाच मिनिटांच्या आत हटविण्यासाठीची चावी आपल्या हातात असणार आहे.. त्यासाठी पुण्यातील एका संस्थेने फेसबुकवर एका गटाची स्थापना केली आहे.
इंटरनेटचा वापर सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, त्याचबरोबर त्याचा वाईट गोष्टींसाठी वापरसुद्धा! त्यातूनच काही अपप्रवृत्तीही याचा गैरवापर करून सामाजिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर महापुरुषांबद्दल झालेल्या बदनामीकारक छायाचित्रांच्या प्रकरणाने हेच दाखवून दिले. पण याला आळा घालण्यासाठी पुण्यातील ‘एम्पॉवर फाउंडेशन’ ही संस्था पुढे आली असून, तिने ‘सोशल पीस फोर्स’ हा ग्रुप स्थापन केला आहे. विशेष म्हणजे त्याला सर्वच थरातून प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. फेसबुकवर कोणताही बदनामीकारक मजकूर वा छायाचित्र टाकले गेले, तर ते या ग्रुपद्वारे काढून टाकण्यात येऊ शकेल. एखाद्या चित्राला किंवा मजकुराला १ हजार ६०० च्यावर लोकांनी ‘रिपोर्ट स्पॅम’ केले तर, ते फेसबुककर्त्यांकडून ५ मिनिटांच्या आत काढून टाकले जाते. बदनामीकारक मजकूर वा छायाचित्र ते सर्वत्र पोहोचण्यासाठी किमान काही तास लागतात. पण ते काढण्यासाठी जो वेळ लागतो, तोवर राज्यभर याचे लोण पसरले जाते आणि पुढील अनर्थ घडत जातात. पोलीस यंत्रणेला हा मजकूर काढण्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो. पण याच गोष्टी इंटरनेटवरुनच लवकर काढण्यात आल्या तर पुढील गोष्टी टाळणे सोपे जाऊ शकते. इंटरनेटवर आलेला कोणताही मजकूर किंवा छायचित्रावर १ हजार ६०० लोकांनी ‘रिपोर्ट स्पॅम’ केले तर ते पाच मिनिटांच्या आत काढून टाकले जाते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवि घाटे यांनी दिली.
या ग्रुपवर सध्या २२ हजार सभासद झाले आहेत. हे सभासद एक महिन्याच्या आत झाले असून यात विविध जाती-धर्माचे लोक आहेत. पण ते जातीसाठी यात सामील झाले नसून त्यांना असल्या गोष्टींना आळा बसवायचा असल्याने सामील झाले आहेत. कोणताही वादग्रस्त मजकूर किंवा छायाचित्र १० मिनिटांच्या आत काढून टाकू शकतो, असेही घाटे यांनी सांगितले.
 
तुम्हीही हे करू शकाल
‘सोशल पीस फोर्स’ या ग्रुपच्या माध्यमातून इंटरनेटवरून आलेले वादग्रस्त छायाचित्र ते ग्रुपच्या पेजवर (मूळ चित्र बदलून) अपलोड केले जाते. गटाच्या सभासदांना एक वेळ दिली जाते. त्या वेळी सर्व सभासद त्या छायाचित्र वा मजकुरावर ‘रिपोर्ट स्पॅम’ करतात. त्याद्वारे फेसबुककर्त्यांला ते चित्र किंवा मजकूर काढण्यास भाग पाडले जाते. फेसबुकवर चित्र, लेखन आदींना लाईक, शेअर आणि कमेन्ट असे तीन पद्धतीत आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. अगदी त्याच्यासमोरील बटनावर ‘रिपोर्ट स्पॅम’ करता येते. मात्र, तुम्ही या गटाचा सभासद होणे आवश्यक आहे.
 
‘‘विदेशी लोक याला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून हे बरोबर नसल्याचे सांगत माझ्या या कामाला विरोध करत आहेत. त्यात अमेरिका आघाडीवर असून त्यातही मूळ भारतीय असलेले आणि तिथे काम करणारे लोकच मला या गोष्टीसाठी विरोध करत आहेत. याला सायबर सेलकडून मान्यता मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेशी मी पत्रव्यवहार केला असून त्यास लवकरच मंजुरी दिली जाईल अशी अपेक्षा आहे.’’
– रवि घाटे (अध्यक्ष, एम्पॉवर फाउंडेशन)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा