कोरेगाव पार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या चालकासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांना गंडा
कोरेगाव पार्कमधील मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून पाच तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात अली. ताब्यात घेतलेल्या तीन तरुणी थायलंडमधील आहेत. या प्रकरणी मसाज सेंटरचालकासह दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.