आयुष्याच्या संध्याकाळी अनेक कुटुंबांमधील ज्येष्ठ नागरिकांच्या वाटेला हालअपेष्टा येतात. काही वेळा पोटचा मुलगा आणि त्याची बायको संपत्तीत हिस्सा मिळावा म्हणून त्रास देतात.. तर काहींना सोसायटीतील शेजारी त्रास देतात.. काहींना सून वेळेवर जेवण देत नाही.. बँकेत वेळेवर पेन्शन जमा होत नाही.. ज्येष्ठांना अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. ज्येष्ठांच्या अशा विविध तक्रारींचे निराकरण करण्यात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात. काहींची मुले व्यवसाय-नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाली आहेत. तर काही जण मुले असूनही एकाकी जीवन जगत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या या समस्या त्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना सामाजिक सुरक्षा विभागाला दिल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी वर्षभरापूर्वी हेल्पलाइनही सुरू केली होती. या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिक त्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्या समस्यांबाबत पोलिसांकडे तक्रारी करतात.
गेल्या वर्षभरात हेल्पलाइनवर आलेल्या एक हजार ८९६ तक्रारींचे निराकरण पोलिसांनी केले. सून आणि मुलगा संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी त्रास देतात, सून जेवण देत नाही, सोसायटीत मुले गोंधळ घालतात, बँकेत वेळेवर पेन्शन जमा होत नाही, सोसायटीतील रखवालदार उद्धटपणे बोलतो या आणि अशा स्वरूपाच्या शेकडो तक्रारी वर्षभरात पोलिसांकडे आल्या. या तक्रारी आल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी त्यांची दखल घेत तक्रारींचे निराकरण करून ज्येष्ठांना मदतीचा हात दिला, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील आणि सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ज्येष्ठांकडून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या पोलिसांच्या पथकात महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नरकयातनेतून सुटका
पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या वर्षभरात बुधवार पेठेतील कुंटणखान्यात डांबून ठेवलेल्या १०६ तरुणींची सुटका केली. त्यात नऊ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणारे दलाल आणि कुंटणखाने चालवणाऱ्या महिला अशा ८० जणांना वर्षभरात अटक करण्यात आली. तसेच स्वामित्व हक्क भंग कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५३ लाख ३७ हजार रुपयांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले. सरत्या वर्षांत पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविली. या मोहिमेत बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांताल बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात यश आले.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या तक्रारी पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर करता येतील.
या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६११११०३ असा आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा