सोसायटय़ांमधील बंद सदनिका फोडण्याबरोबर रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळीच्या चोऱ्या सोसायटीच्या आवारातही मागील काही दिवसांपासून होत आहेत. या चोऱ्या होणाऱ्या सोसायटय़ा लक्षात घेतल्या, तर त्यामध्ये सुरक्षा रक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरटय़ांकडून सोसायटय़ांची पाहणी करून ठराविक सोसायटय़ाच लक्ष्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरामध्ये मध्यवर्ती भागाबरोबरच हडपसर, कोथरूड, वारजे त्याचप्रमाणे पिंपरी- चिंचवड शहरातील विविध सोसायटय़ांमध्ये मागील काही दिवसांमध्ये चोरटय़ांकडून बंद सदनिका फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटय़ांचे धाडस आता त्याही पलीकडे गेले आहे. शहरामध्ये रोजच सोनसाखळ्या हिसकविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात विविध आरोपी पकडले जात असतानाही नवनवे आरोपी समोर येत आहेत. रस्त्यावरून जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या जात होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून सोसायटय़ांच्या आवारातही सोनसाखळ्यांची चोरी झाली आहे. अशा प्रकारच्या आठ ते दहा घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोसायटय़ांतील नागरिकांसाठी ही गंभीर बाब मानली जात आहे.
घटफोडय़ा किंवा सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना झालेल्या बहुतांश सोसायटय़ांमध्ये सुरक्षा रक्षक ठेवलेले नव्हते. त्याचप्रमाणे सोसायटीच्या आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे या घटनांतील आरोपी शोधण्यात पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. चोरटय़ांकडून जाणीवपूर्वक अशाच प्रकारच्या सोसायटय़ा निवडल्या जात असल्याचे बाब त्यामुळे अधोरेखित झाली आहे.
अनेक सोसायटय़ांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालेले असतात. त्यातून सोसायटीचा सार्वजनिक वीजवापर, पाणी, स्वच्छता आदी बाबींसाठीही नियमित रक्कम काही सदनिकाधारकांकडून देण्यात येत नाही. त्यामुळे सोसायटीचा मूळ कारभार चालविणेही कठीण होत असताना सीसीटीव्ही कॅमेरे व त्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्च करणे शक्य नसल्याचे मत काही सोसायटय़ांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने व ती सोसायटीतील प्रत्येकाशी संबंधित असल्याने याबाबतीत तडजोड होऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस एकाच वेळी सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे सोसायटीमध्ये रात्री व दिवसा दोन्ही वेळेला सुरक्षा रक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या सुरक्षा रक्षकाकडे तातडीच्या वेळेला आवश्यक असणारे क्रमांकही असावेत. स्थानिक पोलीस चौकी, पोलीस ठाणे त्याचप्रमाणे त्या-त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांचे क्रमांकही असणे गरजेचे आहे. गुन्हा घडण्याचे चिन्ह असताना किंवा प्रत्यक्ष गुन्हा घडत असताना पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यास गुन्हा रोखण्यास व आरोपींना जेरबंद करण्यासाठी या बाबींकडे सोसायटय़ांनी लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा