नोटिसा बजावून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मोहीम सुरू
उन्हाळ्याच्या सुटीत अनेक जण सहकुटुंब बाहेरगावी गेले असता सोसायटय़ांच्या परिसरात फिरणारे चोरटे टेहळणी करून कुलुपबंद सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करतात. उन्हाळ्यात बहुतांश घरफोडय़ा या दुपारच्या वेळेत होतात, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. अशा प्रकारे होणाऱ्या चोऱ्या आणि चोरटय़ांना रोखण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सोसायटीच्या आवारात रखवालदार नेमावा, अनोळखी व्यक्तीला सोसायटीत प्रवेश देऊ नये, अशा अनेकविध सूचना देणारी नोटीस पोलिसांनी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना बजाविण्यास सुरुवात केली आहे. या नोटिशीच्या माध्यमातून चंदननगर आणि खराडी परिसरातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात भरदिवसा घरफोडी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. चंदननगर, खराडी परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायटय़ा आहेत. खराडी येथे माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने या परिसरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत. घरफोडय़ा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांकडून वेळोवेळी बजाविण्यात येतात. मात्र, बऱ्याचदा या सूचनांकडे काणाडोळा केला जातो, असा अनुभव पोलिसांचा आहे. त्यामुळे चंदननगर पोलिसांनी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी एक पत्र तयार केले आहे. नोटीस म्हणून हे पत्र सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एकशेवीस सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ते म्हणाले, की चंदननगर पोलीस ठाण्यातील गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायांकडे (बीट मार्शल) सोसायटी आणि परिसरातील दुकानदारांना सुरक्षाविषयक सूचना देणारी नोटीस देण्याची जबाबदारी देण्यात आली. अनेक सोसायटय़ांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे, रखवालदार अशा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. घरफोडय़ा टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आतापर्यंत चंदननगर परिसरातील एकशेवीस सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सोसायटय़ाच्या आवारातील दुचाकी वाहने जाळण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चांगल्या दर्जाचे (हाय डेफिनेशन) कॅमेरे सोसायटीचे आवार आणि प्रवेशद्वारात बसविण्यात यावेत. तसेच डीजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) चोरटय़ांना दिसणार नाहीत, अशा पद्धतीने गुप्त ठिकाणी ठेवण्यात यावा. घरफोडी करणारे चोरटे तरबेज असतात. ते सर्वात प्रथम डीव्हीआर काढून घेतात. त्यामुळे घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांचे चित्रीकरण उपलब्ध होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाहेरगावी जाताना घ्यायची काळजी
* शेजाऱ्यांना परगावी जात असल्याची माहिती द्या
* दरवाज्याचे लोखंडी ग्रिल मजबूत आहे ना याची खात्री करा
* घरात ज्येष्ठ नागरिक असल्यास त्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी
* दागदागिने बँक लॉकरमध्ये ठेवावेत
* सिक्युरिटी अलार्म बसवावा
* नजीकचे पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जवळ ठेवावा

बाहेरगावी जाताना घ्यायची काळजी
* शेजाऱ्यांना परगावी जात असल्याची माहिती द्या
* दरवाज्याचे लोखंडी ग्रिल मजबूत आहे ना याची खात्री करा
* घरात ज्येष्ठ नागरिक असल्यास त्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी
* दागदागिने बँक लॉकरमध्ये ठेवावेत
* सिक्युरिटी अलार्म बसवावा
* नजीकचे पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जवळ ठेवावा