एनसीएल-आयसीटीच्या अभ्यासातील निष्कर्ष
पुणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या निर्जंतुकीकरण कक्षात बाह्य़ शरीराच्या आणि कपडय़ाच्या निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाचा ०.०२ ते ०.०५ टक्के भाग वापरण्याची शिफारस पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) केली आहे. निर्जंतुकीकरण कक्षाच्या वापराविरोधात दिल्या जाणाऱ्या सल्लय़ांना शास्त्रीय आधार नसल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून समोर आला आहे.
अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस अशा कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्या बा अंगावर, कपडय़ांवर या निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी केली जाते. त्यासाठी उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षांतील द्रावणामुळे त्वचेवर परिणाम होत असल्याचे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर एनसीएल-आयसीटी यांनी निर्जंतुकीकरण फवारणीसाठी प्रभावी जंतुनाशक रसायन शोधण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाचे विविध प्रमाण भाग वापरून मूल्यांकन केले. त्याद्वारे १२ फूट लांबीच्या सॅनिटायझेशन बोगद्यात सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाचा ०.०२ ते ०.०५ प्रमाण भाग वापरून फवारणी करण्यात आली. या अभ्यासात त्वचेवर विपरीत परिणाम दिसून आला नाही.
आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी अशा अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ०.०५ टक्के , कार्यालयीन किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्गासाठी ०.०२ टक्के सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाची फवारणी पुरेशी आहे, असे अभ्यासाअंती एनसीएल-आयसीटीने स्पष्ट केले आहे.
एनसीएल आणि आयसीटीच्या शास्त्रीय आकडेवारीनुसार सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाचा ०.०२ टक्के ते ०.०५ टक्के प्रमाण भाग विषाणू आणि सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी प्रभावी आहे. काही ठिकाणी दोन टक्कय़ांपेक्षा अधिकच्या द्रावणाचा वापर करण्यात आला. हे प्रमाण आमच्या शिफारशीपेक्षा ४० ते १०० पट अधिक आहे; तर काही ठिकाणी शंभर टक्के संग्रहित द्रावण चुकीच्या पद्धतीने सौम्य करून वापरण्यात आले. बहुतेक ठिकाणी शास्त्रीय पद्धतीनुसार वापर होत नाही.
– डॉ. अश्विनी कुमार नांगिया, संचालक, एनसीएल, प्रा. ए. बी. पंडित, कुलगुरू, आयसीटी, मुंबई</strong>