शालेय मुलांच्या हाती टॅबलेट पीसी आल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार आहे, असे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितले.
आगामी रौप्यमहोत्सवी वर्षांतील पदार्पणानिमित्त समितीच्या कामांची निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये या सॉफ्टवेअरच्याआधारे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारतातील विवेकवादी चळवळ-महाराष्ट्र अंनिसचे योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी डॉ. दाभोलकर बोलत होते.
चार्वाक यांच्यापासून आपल्याकडे विवेकवादाची परंपरा असताना भारताने विवेकवाद पाश्चात्त्यांकडून घेतला असे म्हणणाऱ्यांनी इतिहास तपासून घ्यावा, असे सांगून प्राचार्य लवटे म्हणाले, महात्मा फुले आणि आगरकर यांचा विचार बाजूला ठेवून राज्य सरकार तीर्थटन विकास प्राधिकरण करू लागले आहे. आपल्याला महाराष्ट्र वैज्ञानिक करायचा की धार्मिक याचा विचार केला पाहिजे. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. विजय भटकर यांच्यासारखे मराठी शास्त्रज्ञ जगाला मार्गदर्शन करीत असताना राज्यातच धार्मिकतेचे प्राबल्य आहे. राज्य धर्मनिरपेक्ष होण्यासाठी बालवाडीपासूनच पायाभरणी झाली पाहिजे.

Story img Loader