सिद्धेश्वराच्या मानाच्या काठय़ा.. गड्डय़ाची जत्रा.. हरीभाई देवकरण प्रशालेत मंगळवेढेकरसर आणि श्रीराम पुजारी या शिक्षकांनी केलेले संस्कार.. विविध जाती-धर्माच्या लोकांमधील स्नेहभाव.. सोलापूरला जाताना प्रवासात कुर्डूवाडी आल्यावर मराठी बोलत असताना त्यामध्ये आपोआप येणारा कन्नड-तेलगू भाषेतील उच्चाराचा लहेजा.. अशा मूळच्या सोलापूरच्या परंतु आता कामानिमित्ताने सोलापूर सोडलेल्या मान्यवरांनी ‘गडय़ा आपुला गाव बरा’ असे म्हणत सोलापूरमधील वास्तव्याच्या सुखद स्मृतींचा पट उलगडत शब्द-सुरांनी मैफल मंगळवारी रंगविली.
विजय फाउंडेशनतर्फे ‘सोलापूर डिस्ट्रीक्ट फोरम’च्या माध्यमातून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नाटय़संमेलनाध्यक्षा फैय्याज, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, सिंहगड इन्स्टिटय़ूटचे संस्थापक एम. एन. नवले आणि लॉ कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजित शहा यांचा सन्मान करण्यात आला. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, माजी आमदार हनुमंत डोळस आणि फोरमचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील या वेळी उपस्थित होते.
हा सन्मान माझ्या सोलापूरचा आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील माणसं सोलापूरने दिली. पुलं, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, प्रभाकर पणशीकर आणि दादा कोंडके यांच्यामुळे मी घडले, अशी भावना व्यक्त करीत फैय्याज यांनी ‘पाडाला पिकलायं आंबा’ ही लावणी ठसक्यात सादर केली. ५० वर्षांपूर्वी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकात मी श्यामची तर फैय्याजने गीताची भूमिका केली होती. फैय्याज ही माझी पहिली नायिका होती. वडिलांची बदली झाल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी श्रीराम पुजारीसरांनी मला केवळ घरी ठेवून घेतले असे नाही तर माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले, असे सांगून जब्बार पटेल यांनी बारावी उत्तीर्ण झाल्यावर केवळ सोलापूरला वैद्यकीय शिक्षण देणारे महाविद्यालय नसल्याने मला पुण्यात यावे लागले असे सांगितले. पंढरपूर येथील लोकांच्या तऱ्हेवाईकपणाचे किस्से सांगत मिरासदार यांनी हास्याची कारंजी फुलविली.
आता आमचे सोलापूरमध्ये कोणीही नसले तरी माझ्या आजोबांनी वसविलेली टिकेकरवाडी हे पुढचे स्टेशन आहे. त्यामुळे ही ओळख कधीही पुसू शकणार नाही, असे सांगत अरुण टिकेकर यांनी सोलापूरच्या इतिहासाला उजाळा दिला. विविध जाती-धर्माच्या लोकांमुळे सोलापूरने आम्हाला सर्वधर्म सहिष्णूता शिकविली. त्यामुळे महाराष्ट्र मराठी भाषकांचा आहे असे म्हटले जाते तेव्हा आश्चर्य वाटते. गेल्या दीड वर्षांतील खुनांच्या घटनांमुळे महाराष्ट्र सुरक्षित आहे का, असा प्रश्न अजित शहा यांनी उपस्थित केला.
प्रतिभा पाटील म्हणाल्या, दुष्काळी जिल्हा अशी सर्वसाधारण ओळख असली तरी अशी नररत्ने निर्माण करणारी सोलापूरची भूमी सुपीक आहे. स्वकर्तृत्वाने तळपणाऱ्या या प्रभावी व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करताना आनंद झाला. महासत्ता म्हणजे आर्थिक सुबत्ता आणि लष्करी सामथ्र्य की जीवनमूल्यांची जपणूक करून मोकळा श्वास घेता यावा असे वातावरण याचा विचार झाला पाहिजे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा